करणी सेनेचे लष्करातील क्षत्रिय जवानांना आवाहन
नवी दिल्ली : पद्मावतवरून आक्रमक झालेल्या करणी सेनेने आता चित्रपटाला विरोध करण्यासाठी लष्करातील क्षत्रिय समाजातील जवानांनी अन्नत्याग करावा, असे आवाहन केले आहे. करणी सेनेचे प्रमुख महिपाल सिंह मकवाना यांनी सांगितले की, सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या जवानांनीही राणी पद्मावतीच्या सन्मानाच्या रक्षणार्थ पुढे आले पाहिजे. तुम्ही पद्मावत चित्रपटाच्या विरोधासाठी एक दिवस अन्नत्याग करून लष्करातील मेसमधील जेवणावर बहिष्कार टाका, असे म्हटले आहे.
25 जानेवारीरोजी भारत बंद
पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी राजपूत करणी सेना व काही भाजपाशासित राज्ये प्रयत्न कर आहे. राजस्थान सरकारने चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर 25 जानेवारी रोजी भारत बंद करण्याची घोषणा राजपूत करणी सेनेने केली आहे. त्याच दिवशी हा चित्रपट देशभरात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. करणी सेनेने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन जोशी यांना जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये येऊ देणार नाही आणि भन्साळी यांच्या एकाही चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थानात होऊ देणार नाही, अशी धमकीच दिली आहे.