श्रीनगर-जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळी तीन ठिकाणी चकमक झाली. यामध्ये एक दहशतवादी ठार मारला गेला आहे. यासोबतच एक जवान शहीद झाला असून, एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला आहे. श्रीनगरपासून 58 किमी अंतरावर असणाऱ्या अनंतनाग जिल्ह्यातील डूरु येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. अजून काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता असून सुरक्षा जवानांनी सर्च ऑपरेशनला सुरुवात केली आहे.
चकमक सुरु असल्याने अनंतनाग, श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
श्रीनगरमधील नूरबाग परिसरात सुरक्षा जवानांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशनला सुरुवात केली असता चकमकीला सुरुवात झाली. गुप्तचर यंत्रणांनी काही दहशतवादी एका घरात लपले असल्याची माहिती दिली होती. सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. चकमकीत घरमालकाचा मृत्यू झाला आहे.
दहशतवाद्यांनी घरातून पळ काढला असून जवळच्या ठिकाणीच लपून बसले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे.तिसऱ्या चकमकीत, सुरक्षा जवाना बडगाम जिल्ह्यात एका धार्मिक स्थळाचा ताबा घेणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पळ काढल्यानंतर या धार्मिक स्थळाचा ताबा घेतला आहे.