आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट उत्सवाला सुरुवात
निनो रोबोट ठरतोय टेकफेस्टचे आकर्षण
मुंबई : भारत देशाची राजधानी काय आहे, असा प्रश्न जर एखाद्या विद्यार्थ्याने विचारला, आणि त्याला त्याचे उत्तर अस्खलिखित मराठीतून तेही रोबोटने दिले तर त्याचे आश्चर्य कोणाला वाटणार नाही? मात्र, आयआयटी मुंबईत सुरू झालेल्या टेकफेस्टच्या उत्सवात मराठी मुलांसाठी खास मराठीतून बोलणार्या रोबोट पाहायला मिळाला. आपल्या भाषेतून बोलणारा निनो रोबोट पाहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला. यामुळे दिवसभरात शिक्षण, राजकारण, गणित, इंग्रजीपासून ते खेळ, नृत्य आणि आपल्याला हवे त्या प्रश्नाचे उत्तर चक्क मराठीतून हा रोबोट देत असल्याने दिवसभरात हा रोबोटचे टेकफेस्टमध्ये आकर्षण ठरले.
तंत्रशिक्षणाचा आणि त्यासाठीच्या अविष्कारासाठी जगभरातील तरुण विद्यार्थी आणि संस्थांना संधी उपलब्ध करून देणार्या आयआयटीच्या टेकफेस्टला मुंबईत सुरुवात झाली आहे. यात जगभरातील विविध देशातील तंत्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, संस्था, विद्यापीठेही सहभागी झाली आहेत. मानवाच्या सर्व प्रकारच्या गरजांसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान आणि त्यासाठीचे रोबोट या टेकफेस्टमध्ये आणण्यात आले आहेत. यात बेंगलुरू येथील सीरेना टेक्नॉलॉजीज या कंपनीने तयार केलेला निनो रोबोट हा मराठीतही बोलत असून त्याचा तूर्तास वापर हा शैक्षणिक कामासाठी होत आहे. हा रोबोट गुगलशी जोडलेला असल्याने कोणत्याही प्रश्नांची तो अचूकपणे मराठीत उत्तर सांगतो. हा निनो रोबोट मराठी आणि इतर स्थानिक भाषा बोलतो, शिकवतो, नाचून दाखवतो. एका शिक्षकांमध्ये जे गुण आवश्यक आहेत ते सगळे गुण या रोबोमध्ये अनुभवायला मिळत आहेत.
टेकफेस्टमध्ये निनो रोबोटपेक्षाही सर्वांचे आकर्षण हे जपानच्या अँड्राईड यू ही महिला रोबोचे ठरले. जपानमधील हिरोशि इशिगुरो लॅबमध्ये ही महिला रोबो तयार करण्यात आली असून सर्वात बुद्धिमान आणि वेगवान असलेल्या अँड्रॉईडपैकी ती एक आहे. ही महिला रोबो समोर उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधते. एखादी व्यक्ती ज्याप्रमाणे हितगुज करतो, तशी ती समोरच्या व्यक्तीशी बोलत असते. विशेष म्हणजे, ही हुबेहूब एखाद्या महिलेप्रमाणे तयार करण्यात आली असल्याने कोणालाही या रोबोटसोबत बोलण्याची इच्छा होते. ही रोबोट प्रत्येक प्रश्नांची उत्तर देते. त्याचप्रमाणे मुलांना शिकवण्यापासून ते माणसाला तणावमुक्त करण्यासाठी छान-छान गोष्टीदेखील ती बोलून दाखवते. ज्याप्रमाणे माणूस हातवारे, चेहर्यावरचे हावभाव करतात त्याचप्रमाणे ही अँड्राईड यू रोबोदेखील हुबेहूब तशीच बोलून आणि करून दाखवते.
रोबोटची मांदियाळी
चहा आणणे, माणसाला थकवा आला असेल तर त्याचे डोके दाबणे आणि इतर गोष्टी, एका जागेवरून दुसर्या जागी ठेवण्याचे काम करणारा इंडिरो 3.0 हा रोबो संतोष हुलावळे या मराठी तरुणाने तयार केला आहे. हा रोबो सर्वात स्वस्त असून चीनच्या रोबोला टक्कर देणारा रोबो ठरू शकतो, असे हुलावळे यांनी सांगितले. या टेकफेस्टमध्ये नक्षीकाम करण्यापासून ते अभियांत्रिकीचा विविध अविष्कार सादर करणारे, मोटारसायकल, कार आदींचे पार्टस जोडणारे, थकवा घालवणारे, नृत्य करणारे आणि त्यासोबत मैदानी खेळ खेळणारे असे विविध प्रकारचे रोबोट पाहावयास मिळत असून पुढील दोन दिवस ते मुंबईकरांना अनुभवायला मिळणार आहेत.