जव्हार । सण उत्सवाच्या काळात 24 तास वीजपुरवठा केला म्हणून की काय? सध्या शहरात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत आहे. चौकशीकरिता ग्राहकांनी फोन केल्यास डायरेक्ट गेली, डहाणूहून गेली, ब्रेक डाउन आहे असे सांगण्यात येत आहे. भोळी भाबडी जनता बिचारी लाईट येण्याची वाट पाहत राहते. कधी भारनियमन तर कधी दुरुस्तीचे कारण सांगितले जाते. त्यामुळे अधिकार्यांनाच नेमका काही बोध होत नसेल तर महावितरणचा कारभार कशा पद्धतीने चालू आहे याची प्रचिती येत आहे.
पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीस केलेल्या हजारोंचा अगर लाखोंचा खर्च नेमका कशावर केला याचाही शोध लागणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे शहर तसेच सभोवतालच्या परिसरातील दुरुस्तीचे काम केले असल्याचे सांगितले जात असले तरी जागोजागी वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा दिसत आहेत. याशिवाय सध्या टायफाईड, मलेरिया, डेंग्यू तसेच कावीळ साथींच्या आजारांची लागण झाली असल्याने, विद्युतपुरवठा खंडित असल्याने त्यांना सदर रक्त तपासणी करण्यास प्रचंड अडथळा येत आहे.
विद्युतपुरवठा खंडित करायचा असल्यास सूचना फलक अथवा वाहन फिरवून ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात यावी, जेणे करून वेळ वाया जाणार नाही.
– योगेश शांताराम रजपूत, जव्हार