जसप्रीत बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर

0

मुंबई: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला प्रतिष्ठेचा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी २०१८- १९च्या वार्षिक पुरस्काराची घोषणा केली. आयसीसीच्या वनडे क्रमवारीतील अव्वल गोलंदाज बुमराहने जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पदार्पण केले होते. त्याने आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, आणि वेस्ट इंडिज संघांविरुद्ध प्रत्येकी ५ विकेट घेण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव आशियाई गोलंदाज आहे.

बुमराहने एक ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या ६ कसोटी सामन्यांमध्ये ३४ विकेट घेतल्या. तर १७ वनडेत ३१ विकेट आणि ७ टी-२० सामन्यात ८ विकेट घेतल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. भारतीय संघाने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया संघाचा त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभव केला होता. भारताच्या या विजयात बुमराहचा महत्त्वाचा वाटा होता. पुरुषांच्या विभागात बुमराहला सर्वोच्च पुरस्कार मिळाला तर महिला क्रिकेटपटूंमध्ये पुनम यादवने सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. पुनमने १ ऑक्टोबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात ८ वनडेत १४, १५ टी-२० सामन्यात २० विकेट घेतल्या आहेत. अन्य पुरस्कारांमध्ये चेतेश्वर पुजारा, मयांक अग्रवाल यांचा गौरव केला जाणार आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारांच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहील आणि हिटमॅन रोहित शर्मा याचा समावेश नाही.

याशिवाय भारताचे माजी कर्णधार के.श्रीकांत आणि अंजुन चोप्रा यांना कर्नल सी.के.नायडू जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघात श्रीकांत होते. वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात श्रीकांत यांनी भारताकडून सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर ते भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख होते. श्रीकांत यांनी निवडलेल्या भारतीय संघाने २०११मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता.