पशुवैद्यकिय डॉक्टर्सची मोर्चाद्वारे मागणी : जिल्हाधिकार्यांना निवेदन
जळगाव: जस्टीस फॉर प्रियंका……हंग द रेपिस्ट अर्थात प्रियंका रेड्डीला न्याय मिळवून देण्यासाठी व नराधमांना फाशी द्यावी या मागणीसाठी आज जिल्ह्यातील पशु वैद्यकीय डॉक्टरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चानंतर जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
हैद्राबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी पशु वैद्यकीय डॉक्टरांनी मोर्चा काढला. आज सकाळी 11 वाजेपासून जिल्ह्यातील पशुवैद्यकिय डॉक्टर्स शहरातील जी.एस. ग्राऊंडवर जमा झाले. दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरवात झाली. मोर्चात तब्बल 250 ते 300 पशुवैद्यकिय स्त्री-पुरूष डॉक्टर्स सहभागी झाले होते.
मोर्चाच्या अग्रभागी महिला डॉक्टर्सनी हातात धरलेल्या फलकावर डॉ.प्रियंका रेड्डीचे छायाचित्र, बलात्कारांना फाशी द्या अशी मागणी स्पष्ट दिसत होती. नवीन बस स्थानक,स्वातंत्र चौक मार्गे हा मोर्चा दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. कार्यालयाच्या गेटजवळ मोर्चा अडविण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
महिलांच्या तक्रारी तात्काळ घ्याव्या
जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्लुर जि.हैद्राबाद येथील पशुवैद्यकिय महिला डॉक्टर प्रियंका रेड्डी या शासकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर बलात्कार करून अत्यंत निघृणपणे खून करण्यात आला. या घटनेचा आम्ही निषेध नोंदवित आहोत. भारतीय संविधानाच्या अभिप्रेत महिलांचे व्यक्ती स्वातंत्र्य व संरक्षण याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महिला संरक्षण संदर्भात तक्रारीसाठी ज्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखल होईल तेथूनच कार्यक्षेत्राचे कारण न दाखवता संबंधितास इतर पोलीस स्टेशनला पाठविणे बंद झाले पाहिजे. इतर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र असल्यास कार्यक्षेत्राची सबब न देता एफ.आय.आर.तात्काळ ऑनलाईन नोंद करण्याची पध्दत कार्यान्वित करावी, तसेच तेथूनच तात्काळ मदतीची कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात यावी. डॉ. रेड्डी यांची हत्या करणार्या नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यांची होता सहभाग
जिल्हाधिकार्याना निवेदन देणार्या शिष्ट मंडळात डॉ.पी.एल.राणे, डॉ.ए.एम.इंगळे, डॉ.स्वप्नजा लोखंडे, डॉ.अनिल देशमुख, डॉ. जे.एस.नारखेडे, डॉ. ए.डी.पाटील, डॉ.एन.आर.पाटील, डॉ.नितीन सोनवणे, डॉ.राधा कोळी,डॉ.दिप्ती कचवे, डॉ.योगिता अमृतकर, डॉ.उर्मिला जगताप यांचा सहभाग होता.