जळगाव । येथील कै.वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे यंदाही ज्येष्ठ डॉक्टरांच्या कृतज्ञतापुर्वक गौरव सोहळ्याचे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार 27 रोजी दुपारी 3.30 वाजता आयएमए सभागृहात कृतज्ञतापुर्वक गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उपक्रमाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. यात ज्येष्ठ डॉ.वैजयंती पाध्ये व डॉ. सुनील चौधरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. डॉ.पाध्ये या जळगाव पाचोरा येथे गेल्या 35 वर्षांपासून रुग्णसेवा देत आहे. इंडियन डेंटल असोसिएशन जळगाव व रोटरी ईस्टच्या त्या माजी अध्यक्षा आहेत. 25 हजारहुन अधिक शालेय विद्यार्थ्यांची डॉ. पाध्ये यांनी दंत तपासणी केली आहे. त्यांनी मेडिकल मिशन अंतर्गत झिम्बाँबे येथे जाऊन विनामूल्य रुग्णसेवा दिली आहे. तर डॉ. सुनिल व्ही. चौधरी हे जळगावात 1988 पासून रुग्णसेवा देत असून ते मुळचे पाल (ता.रावेर) येथील रहिवासी आहेत. सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष वैद्य जयंत जहागिरदार यांनी आवाहन केले आहे.