मुंबई : जाड्या वजनाने कुणाच्या भावना कशा दुखावल्या जाऊ शकतात आणि काय-काय गंमती-जमती होऊ शकतात, हे अगदी स्पोर्टी आणि अनोख्या पद्धतीने दाखविणारी, खळखळून हसविणारी निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे यांची ‘जाडूबाई जोरात’ ही मालिका २४ जुलैपासून ‘झी मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोमवार ते शनिवार दुपारी एक वाजता ती दाखविली जाईल.
‘जाडूबाई जोरात’ मालिकेची कथा आहे जुईची. वाढलेल्या वजनावरून घरी आणि ऑफिसमध्येही जुईची टिंगल उडवली जाते. दुसरीकडे जुईच्या शेजारीच राहणारी मल्लिका स्वतःकडे लक्ष देणारी, फिटनेस जपणारी आणि महत्त्वाकांक्षा. जुई ही संसार आणि नोकरी सांभाळण्याची तारेवरची कसरत करणारी मध्यमवर्गीय महिला. मर्यादित गरजा, स्वप्न असलेल्या साध्या-सरळ स्वभावाच्या जुईचे घरातील इतरांचा विचार करताना स्वतःकडे दुर्लक्ष झालेले. अन्न वाया जाऊ नये म्हणून शिळं पाकं खाणं अंगाला लागलेली आणि त्यातच वजन वाढलेली ही जुई. सर्वांसाठी सर्व काही करणं हा तिचा स्वभाव असला तरी तिचा विचार मात्र कुणीच करत नाही.
मल्लिका जुईला तिच्या वाढलेल्या वजनावरून एकदा सुनावते, त्यामुळे जुईचा अहंकार दुखावला जातो आणि मग ही जाडूबाई एक आगळावेगळा निर्धार करते. याच जाडूबाईची गोष्ट म्हणजे ही मालिका. निर्मिती सावंतने जाडी जुई तर किशोरी शहाणेने स्लीम-ट्रीम मल्लिकाची भूमिका रंगविली आहे. राजेश देशपांडे यांच्या लेखणीने मालिका भन्नाट रंगवलीय.
आनंद काळे, विघ्नेश जोशी, संचिता कुलकर्णी, सिद्धार्थ खिरीद, प्रदीप जोशी, संजीवनी समेळ, जयंत सावरकर हे कलाकारजी ‘जाडूबाई’त दिसतील. ट्रम्प कार्ड प्रॉडक्शनने मालिकेची निर्मिती केली आहे.