लोणावळ्याची मानाची हंडी जाखमाता गोविंदा पथकाने फोडली

0

लोणावळा : जाखमाता गोविंदा दहिहंडी पथक तुंगार्ली यांनी सहा थरांचा मनोरा रचत लोणावळा शहरातील मानाची पहिली व एकमेव हंडी फोडली. तसेच वैयक्तिक बक्षिसे देखील देण्यात आली व त्यांना प्रथम क्रमांकाचे 51 हजार रुपये रोख चषक देण्यात आले.

मावळ वार्ता फाऊंडेशन, श्री स्वामी समर्थ प्रमोटर्स, लोणावळा शहर पत्रकार संघ, स्पेसलिंक केबल नेटवर्क व सर्व राजकीय पक्ष यांच्या वतीने मागील अनेक वर्षापासून शिवाजी महाराज चौकात लोणावळा शहर दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी भांगरवाडी येथील मानाची हंडी व शहरात मागील वर्षी नव्याने सुरु झालेल्या दोन हंड्या यावर्षी रद्द झाल्याने शहरात पुन्हा एकदा एक गाव एक दहिहंडी महोत्सव झाल्याने नागरिकांनी व गोविंदा पथकांनी जल्लोष केला.

दुपारी दोन वाजता नगराध्यक्षा सुरेखा जाधव व आयोजन समितीच्या सदस्यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. मुंबई, ठाणे, घाटकोपर, पनवेल, वडाळा, पाचपाखडी भागातून आलेल्या तब्बल 47 गोविंदा पथकांनी या मानाच्या हंडीला सलामी दिली तर लोणावळा शहर व ग्रामीण भागातील 14 संघांनी सलामी देत महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. समितीच्या वतीने 5 लाख 55 हजार 555 रुपयांची बक्षिसे वाटप करण्यात आली.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय तथा बाळा भेगडे, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, उद्योजक सुधाकर शेळके, नारायण मालपोटे यांनी महोत्सवाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय गवळी, नगरसेवक नितीन आगरवाल, संजय घोणे, दिलीप दामोदरे, सुधीर शिर्के, रचना सिनकर, संध्या खंडेलवाल, मंदा सोनवणे, उमा मेहता, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष विनय विद्वांस, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र चौहान, श्री स्वामी समर्थ प्रमोटर्सचे डाँ. किरण गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे, मावळ वार्ताचे संचालक संजय आडसुळे आदी मान्यवर सोहळ्यात उपस्थित होते.

सातव्या थरावर मानाची हंडी फोडण्यासाठी रात्री साडेआठ नंतर सुरुवात झाली. प्रथम तेरा संघांचे लॉट पाडण्यात आले. मात्र त्या फेरीत कोणत्याही संघाली हंडी फोडता न आल्याने हंडी एक टप्पा खाली घेत कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या चार स्थानिक संघांचे लॉट पाडण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांकाची चिठ्ठी निघालेल्या तुंगार्ली गावातील जाखमाता गोविंदा पथकाने सहाव्या थरावर हंडी फोडली. यानंतर चौकात जाखमाता पथकाने जल्लोष साजरा केला. आता पर्यत सहा वेळा जाखमाता संघाने मानाची हंडी फोडण्याचा मान मिळविला आहे. मावळ वार्ता फाऊंडेशन व लोणावळा शहर पत्रकार संघाचे सदस्य यांनी महोत्सवाचे संयोजन केले होते.