मुरबाड | मुंबई मध्ये मराठ्यांचे भगवे वादळ घोंघावत असताना मुरबाड मध्ये तालुक्यातील स्थानिक आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढलेल्या अत्यंत शिस्तबद्ध मिरवणुकीने आपली ताकत व एकजूट दाखवून दिली. माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेले वालीवरे ते दाऱ्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या पेंढरी, वाघाच्या वाडी पासूनचे आदिवासी चला र मुरबाडल, चला र मुरबाडल अशा ठाकरी भाषेत असा नारा देत मुरबाड येथे जमले होते. त्यामध्ये महिलांची व तरुणांची संख्या मोठी होती
हातामध्ये मासेमारीचा मळई, कठोळा, भोक्षी, तोंडया, डोक्यावर मी आदिवासी, जय आदिवासी असे लिहिलेल्या पांढऱ्या शुभ्र टोप्या घालून पारंपरिक आदिवासी वाद्ये वाजवत व आदिवासी बांधवा जागा हो, बिरसा मुंडा जिंदाबाद अशा घोषणा देत होते. या मिरवणुकीमध्ये पारंपरिक आदिवासी समाजाच्या वेशभुषा करण्यात आली होती. तसेच मुरबाड तालुक्यातील केव्हावारवाडी येथिल आदिवासी बांधवांनी धामडी नृत्य, मोहवाडी येथिल आदिवासी महिलांनी पारंपारिक वेशाषात गोल रिंगण धरुन टाळ्यांचा नृत्य तसेच वाल्हिवरे अनुदानित आश्रम शाळेतील मुलींनी ठाकर-ठाकर या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले.ह्या आदिवासी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुरबाड एमआयडीसीपासून निघालेली ही मिरवणूक हुतात्मा हिराजी पाटील प्रवेश द्वार, शिवाजी चौक,नगर पंचायत कार्यालय , माता नगर, तीन हातनाका मार्गाने तहसील कार्यालयात दाखल झाली तेथील वाहन तळावर नेते मंडळींची भाषणे झाली व तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी मुरबाड व कर्जत तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव म्हसा येथील चौकात एकत्र आले. या विभागात आदिवासींच्या पारंपारिक वस्तूंचा डोळी, इरले, मुस्की, सातोर, घोंगडी, सुल्या, दाताली अशा वस्तूंचे प्रदर्शन असलेला रथ फिरवण्यात आला. तेथे ढोलाच्या तालावर रिंगण धरीत सांस्कृतिक नृत्ये सादर करण्यात आली.
आदिवासींच्या मागण्या
जागतिक आदिवासी दिन शासकीय कार्यालयात शाळा कॉलेज व ग्राम पंचायती मध्ये साजरा करावा.
आदिवासींना मिळणाऱ्या शासकीय योजनांची योग्य अंमलबजावणी करावी.
आदिवासी आरक्षणानुसार कर्मचारी भरती करण्यात यावी.
बोगस आदिवासी भरती बंद करून अशा लोकांवर कारवाई करावी.
जागतिक आदिवासी दिनाची ठाणे जिल्ह्यात राखीव सुटी जाहीर करावी.
आदिवासी विद्यार्थ्यांची थकलेली शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यात त्वरित जमा करावी. अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.