जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने शासकीय सुट्टी जाहीर करा

0

जुन्नर । जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या संख्येने असल्याने जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने पुढील वर्षांपासून शासकीय सुट्टी जाहीर करावी, या मागणीचा ठराव नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन एकमताने मंजूर केला आहे. जुन्नर येथे फेडरेशनच्या तालुका शाखेचा उद्घाटन समारंभ पार पडला. त्यावेळी हा ठराव करण्यात आला. या मागणीसह पहिल्याच बैठकीत महत्त्वाचे ठराव संघटनेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती राज्य अध्यक्ष मारुती वायळ यांनी दिली.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन या संघटनेच्या जुन्नर तालुका शाखेचा उद्घाटन समारंभ हभप महंत योगी बेलनाथ महाराज यांच्या हस्ते झाला. यावेळी झालेल्या बैठकीमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत असणार्‍या आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये आदिवासी दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्याकडे करण्यात आली होती. देवकाते यांनी शिक्षणाधिकार्‍यांना संबंधित विषयन्वये आदेश निर्गमित केले असल्याचे सांगण्यात आले. तसेच शिवजन्मस्थळ असणारा किल्ले शिवनेरी ताब्यात घेत असताना 1600 आदिवासी मावळे शहीद झाले होते. हा इतिहास जागृत राहावा यासाठी जुन्नर येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळा चौकातून किल्ले शिवनेरीकडे जाणार्‍या रस्त्याला वीर बिरसा मुंडा प्रवेशद्वार उभारण्यात यावे, हा ठराव यावेळी एकमताने मंजूर करण्यात आला असल्याचे राज्य अध्यक्ष मारुती वायळ व तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर लांडे यांनी सांगितले.
यावेळी संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणपत लांडे तर केशव वायळ यांनी आभार मानले.