1 मे दिवस जसा ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो, तसाच तो ‘जागतिक कामगार दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. हा योगायोग म्हणावा लागेल. कारण या दोन्ही दिवसांचा इतिहास हा रक्तरंजित आहे. एका बाजूला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी आंदोलन करणार्यांवर मोरारजी देसाई यांच्या आदेशावरून बेछूट गोळीबार करण्यात आला, ज्यात 105 जणांनी हौतात्म्य पत्करले. त्यानंतर 1 मे रोजी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करण्यात आली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्रासाठी ऐसिहासिक आहे तसेच 1880 साली अमेरिकेतील कामगारांना दिवसाकाठी 10 ते 12 तास काम करावे लागते म्हणून त्यांनी आपल्या कामाचे तास कमी करून 8 तास करण्याची मागणी केली. 1884 साली भरवण्यात आलेल्या ‘अमेरिकन फेडरेशन ओफ लेबर’च्या अधिवेशनात असे ठरवण्यात आले की, जर मालकांनी 1 मे 1886 पूर्वी कामाचे तास कमी केले नाहीत तर कामगार बेमुदत संपावर जातील. त्याप्रमाणे कामगार संपावर गेले. मात्र, इथेही पोलीस बळाचा वापर करून गोळीबार करण्यात आला ज्यात 5 कामगारांचा मृत्यू झाला. पुढे काही दिवसांनी अमेरिकेत कामगारांच्या कामाची वेळ 12 तासांवरून 8 तास करण्यात आली, तेव्हापासून 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दरवर्षी 1 मे रोजी जगभरातील 80हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो तसेच 1 मे, 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो आहे.
अमेरिकेत ‘1 मे’चे महत्त्व
1 मे 1886 रोजी अमेरिकेतील 3 लाख 50 हजार कामगारांनी कामाचे तास कमी करण्यासाठी बेमुदत संप पुकारला. 3 मे 1886 रोजी मेकोर्मिक हार्वेस्टर फेक्टरीमध्ये मालकांनी पोलीस बलाचा वापर करून संप फोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अचानकपणे सुरू केलेल्या गोळीबारात 6 कामगार जागीच ठार झाले, तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेचा निषेध करण्यासाठी ताबडतोब दुसर्याच दिवशी 4 मे रोजी ‘हे मार्केट स्न्वेअर’ येथे जाहीरसभा बोलवण्यात आली. सभा शांततेत पार पडली. लोक परतत असतानाच अचानक एका पोलीस अधिकार्याने 180 पोलिसांसह सभास्थानी प्रवेश केला व बळजबरीने लोकांना हाकलण्यास सुरुवात केली. दरम्यान, गर्दीतून कुणीतरी पोलिसांवर बॉम्ब फेकला. या स्फोटात एक पोलीस जागच्या जागी ठार होऊन 5 जण नंतर मरण पावले व अनेक पोलीस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अनेक कामगार मृत्युमुखी पडले, तर कित्येक जण जखमी झाले.
सरकारने पार्सन्स, नीब, स्पाईस, फिटडायीन, स्काँब, लिंग, एन्जल व फिश्चर अशा 8 निवडक अमेरिकन पुढार्यांवर पोलिसांच्या हत्येचा आरोप ठेवला. निबला 15 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. लिंगने तुरुंगात आत्महत्या केली, तर पार्सन्स, स्पाईस, एन्जल आणि फिश्चर यांना 11 नोव्हेंबर 1887 रोजी फासावर लटकावण्यात आले. अशा तर्हेने अमेरिकन कामगार पुढार्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन केवळ अमेरिकेतीलच नव्हे तर इतर अनेक देशांतील कामगारांचे कामाचे तास 14 वरून 8 वर आणले व ते जगाच्या इतिहासात अमर झाले. त्यानंतर 1889 साली जगातील नामवंत कामगार पुढारी एका आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी पॅरिस इथे जमले असता त्यांनी 8 तासांच्या दिवसाची मोहीम जगातील सर्व देशांमध्ये पसरवण्याचा निर्णय घेतला व 1 मे 1890 रोजी संपूर्ण जगभर या 4 शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम घोषित केला आणि याच दिवसापासून नियमितपणे संपूर्ण जगभर 1 मे हा कामगार दिन म्हणून पाळण्यात येतो.
इंग्लंडमध्ये ‘1मे’चे महत्त्व
इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा उत्पादन वाढले, बाजारपेठांमध्ये मागणी वाढली. त्यामुळे कमी मनुष्यबळाच्या साहाय्याने अधिकाधिक उत्पादन निर्मिती करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. अशा प्रकारे कामगारांची पिळवणूक सुरू झाली. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास 12 ते 14 तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ 8 तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु, उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने 1 मे 1891 रोजी झाली. ज्यामध्ये खालील मागण्या संमत करण्यात आल्या.
1. कामाचा आठ तासांचा दिवस असणार
2. बालमजुरांना प्रतिबंध
3. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
4. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
5. साप्ताहिक सुट्टी सक्तीची
6. कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
7. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य.
त्यामुळेच देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी 1 मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील 80 देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्या कामगारांचा गौरव करण्यात येतो.
अनेक वर्षांनंतर अधिकाधिक देशांतले कामगार 1 मे दिनाच्या सोहळ्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती, देशातील शहरामध्ये लाखो कामगार 1 मे दिन साजरा करू लागले. 1 मे दिवस आंतरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणार्या मानवाच्या पिळवणुकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार 1 मे दिवसात होऊ लागला. 1 मे दिवस ही सगळ्या कामगार चळवळीची परंपरा झाली.
1905 च्या 1 मे या दिवसासाठी लेनिनने लिहिलेल्या पत्रकात म्हटले होते, कामगाराकामगारात, राष्ट्राराष्ट्रांत, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटारूंचा आणि जुलूमशहांचाच फायदा होतो. कारण ते कामगारवर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवरच जगत असतात. ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीडश, आर्मेनियन आणि तातार, पोलिश आणि रशियन, ल्याटिन आणि जर्मन सारे भेदभाव विसरून समाजवादाच्या एका झेंड्याखाली आपण सारे आगेकूच करू या. सर्व देशातील कामगारांची ही ऐक्यशक्ती, आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती, 1 मे दिनाला आपल्या दलांची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बल संघटित करते.
अनेक वर्षे लोटली तशा अधिकाधिक देशांतल्या तुकड्या 1 मे दिनाच्या सोहळ्यात सामील होत गेल्या आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार 1 मे दिवस साजरा करू लागले आणि 1 मे दिवस आंतरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणार्या मानवाच्या पिळवणुकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार 1 मे दिनात होऊ लागला. 1 मे दिवस ही सर्व कामगार चळवळीची परंपरा झाली.
भारतातील पहिला कामगार दिन
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात 1 मे 1923 रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रथम लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.
राकेश शिर्के – 9867456984