जागतिक कॅन्सर दिनानिमित्त पोस्टर लाऊन जनजागृती

0

जळगाव । जगभरात 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोगदिन म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कर्करोग महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात, कुठल्याही घडीला 25 लाख कर्करोगपीडित रुग्ण आढळतात, त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. अशा प्रसंगी कॅन्सर विषयी लोकांच्या मनातील भीती कमी करून जनजागृती करणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

कॅन्सरचे लक्षणे व घ्यावयाची काळजी
लोकांच्या मनातील भिती कमी करण्याचा एक भाग म्हणून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने व कॅन्सर तज्ञ डॉ. गोविंद मंत्री यांच्या सहकार्याने कॅन्सर जनजागृती पोस्टर तयार करण्यात आले. या पोस्टरचे प्रकाशन इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथे सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हे महितीपर पोस्टर संपूर्ण जळगाव शहरात पेट्रोल पम्प, कॉलेज, विविध हॉस्पिटल, सिविल हॉस्पिटल, बस स्टँड, रेल्वे स्टेशन व अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आले. कॅन्सरची लक्षणे व त्या बाबतीत घ्यावयाची काळजी या बाबींचा उल्लेख पोस्टर मध्ये करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य राजेश यावलकर, कॅन्सर तज्ञ डॉ. गोविंद मंत्री, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, जनसंपर्क अधिकारी उज्वला वर्मा आदी उपस्थित होते. कॅन्सर विषयी मार्गदर्शन किंवा मदत हवी असल्यास रेडक्रॉसशी संपर्क करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.