28 व 29 एप्रिल रोजी होणार कार्यक्रम
पिंपरी : लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत डी आणि नृत्यतेज अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक संवर्धनाच्या उद्देशाने 28 व 29 एप्रिल 2018 या दोन दिवसीय लायन टॅलंट हंट 2018 आणि नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे लायन्स क्लब व सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख तेजश्री अडिगे यांनी सांगितले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात जागतिक नृत्यदिनाचे औचित्य साधून हा नृत्य महोत्सव होणार आहे. लहान मुलांकरिता व युवकांकरिता लायन रायझिंग स्टार या स्पर्धेअंतर्गत वाद्य वादन, गीत गायन, एकपात्री अभिनय आणि सोलो नृत्य प्रकार असणार आहे. लायन आयकॉन या व्यक्तिमत्व स्पर्धेत युवक, युवती आणि महिलांचा सहभाग असेल. बालकांचा वयोगट 6 ते 9, युवकांसाठी 10 ते 15 व 16 ते 28 आणि महिलांसाठी खुला गट असणार आहे.
लायन्स इंटरनॅशनल ही संघटना समाजात सेवाकार्य करण्यासाठी प्रचलित आहे. प्रांतपाल गिरीश मालपाणी यांनी युवा प्रेरणा वर्ष जाहीर केले आहे. त्याप्रमाणे समाजातील बाल व युवापीढीसाठी सांस्कृतिक व्यासपीठ मिळावे. तसेच, महिलांना आपले कला, कौशल्य सादर करता यावे. त्यांच्या कला, गुणांना वाव मिळावा. या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. या महोत्सवातील सहभागी होण्यासाठी 24 एप्रिल 2018 रोजी चिंचवडच्या प्रतिभा कॉलेजमध्ये प्राथमिक फेरी होणार आहे. यात अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे. तेसच, संयोजक तेजश्री अडिगे 9823060331, उमा पाटील 9881576676, सीमा पारखे 9527662255 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.