जळगाव । जिल्ह्यातील चेतन वाणी व भूषण शिरुडे या दोन तरुणांची निवड संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अ वर्ल्ड अँट स्कूल’ या उपक्रमाअंतर्गत ’जागतिक युवा राजदूत’ पदी निवड झाली. याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी असलेल्या या उपक्रमासाठी जगभरातून केवळ पाचशे तरुणांची निवड केली जाते. त्यात जिल्ह्यातील या दोघांची निवड झाल्याने त्यांचा सर्वत्र कौतुक होत आहे. जळगाव शहरातील चेतन वाणी यांनी ’वैश्यवाणी युवा फाऊंडेशन’चे सचिव व ’जय श्रीराम बहुउद्देशीय संस्थे’चे उपाध्यक्ष म्हणून तसेच चाळीसगाव तालुक्यातील बहाळ या छोट्याश्या गावातील तरुण भूषण शिरुडे यांनी ’मेडलाईफ फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष म्हणून संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, कला , क्रीडा, आरोग्य, कृषी, पर्यावरण या क्षेत्रात आजपर्यंत विविध कार्य केले.
निवडीचे पत्र प्राप्त
त्यांच्या समाज कार्याची दखल आता संयुक्त राष्ट्रसंघानी घेतली आहे. त्यामुळे त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अ वर्ल्ड अँट स्कूल‘ या उपक्रमात जागतिक राजदूत होण्याची संधी मळाली आहे. युकेच्या पंतप्रधानांच्या पत्नी सारह ब्रोन या ‘अ वर्ल्ड अँट स्कुल’च्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या सहीचे जागतिक युवा राजदूत म्हणून निवडीचे पत्र चेतन वाणी व भूषण शिरुडे यांना प्राप्त झाले आहे.
तीन वर्ष करणार काय
‘अ वर्ल्ड अँट स्कूल’ या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण प्रामुख्याने अशिक्षित वर्गातील नागरिक आणि विद्यार्थी यांना शिक्षणाचे धडे देणे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी जनजागृती करून कार्य केले जाते. जगभरातून 80 देशातील केवळ 500 सदस्य या उपक्रमासाठी निवडले जातात. यापूर्वी कळवण येथील विनीत मालपुरे आणि नाशिक येथील अमोल अलई यांची निवड झालेली आहे. 1 ऑगस्ट 2017 ते 31 जुलै 2020 पर्यंत चेतन व भूषण जागतिक युवा राजदूत म्हणून काम पाहणार आहेत.
वैश्यवाणी युवा फाऊंडेशन आणि जय श्रीराम बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेल्या घटकांना पुढे आणण्याचे कार्य केले आहे. ’अ वर्ल्ड अँट स्कूल’ उपक्रमाअंतर्गत जागतिक युवा राजदूत म्हणून नव्याने मिळालेल्या जबाबदारीला मी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करेल.
– चेतन वाणी
मेडलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रात अनेक दुर्गम भागांमध्ये जाऊन सामाजिक कार्य केले आहे. अ वर्ल्ड अँट स्कूल उपक्रमाअंतर्गत जागतिक युवा राजदूत म्हणून मला आता माझे कार्य अधिक जोमाने करता येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणिशारीरिक सक्षमतेसाठी मी प्रयत्नशील राहील.
– भूषण शिरुड