भुसावळ विभागात रॅलीचे स्वागत : ‘वाघोबाचा खटला’ पथनाट्यातून समाजमनाचे प्रबोधन
भुसावळ- जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण संस्था व नविभागाच्या सहकार्याने जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्यासाठी व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅली जळगाव येथून काढण्यात आली. वाघांचा अधिवास असलेल्या डोलारखेडा येथे 28 रोजी ही रॅली पोहोचल्यानंतर तिचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जळगांव वनविभागाचे सहाय्यक उपवन संरक्षक आर.एस.दसरे, पोलीस उपअधीक्षक सुभाष नेवे, जिल्हा परीषद सदस्य बाळू इंगळे, डोलारखेडा उपसरपंच सुरेश कोळी, स्टँडिंग फॉर टायगर फौंडेशन मेळघाटचे अध्यक्ष रवींद्र मोहोड, वढोदा वनक्षेत्रपाल अमोल चौहान आदी उपस्थित होते.
भुसावळात रॅलीचे स्वागत : पथनाट्यांनी वेधले लक्ष
डोलारखेडा, मुक्ताईनगर, पुरी गोलवाडेनंतर भुसावळ ही रॅली आल्यानंतर तिचे स्वागत करण्यात आले. भुसावळ येथील हेल्पर ग्रुपतर्फे पथनाट्य सादर करण्यात आली. यात ‘वाघोबाचा खटला’ या विषयावर गमतीशीर पद्धतीने मानव वन्यजीवांच्या संघर्षाला कसे टाळता येईल, वृक्ष जगवा, जंगल वाचवा असा संदेश देत परीसरातील डोलारखेडा, नांदवेल, वायला, दुई, सुकळी, पूर्णा फाटा, महालखेडा, गावांमध्ये रॅली काढून वाघ आणि वन्यजीवांबद्दल माहिती देण्यात आली. वाघांचे आपल्या जीव साखळीत काय महत्व आहे याबाबत माहिती असलेल्या पाच हजार पत्रकांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक राहुल सोनवणे यांनी केले सूत्रसंचालन बाळकृष्ण देवरे यांनी तर आभार प्रदर्शन संस्थाध्यक्ष वासुदेव वाढे यांनी केले. भुसावळ येथे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी रॅलीचे स्वागत केले. प्रसंगी प्राचार्य नीना कटलर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
रावेर वनविभागातही जनजागृती
रविवारी दुपारी यावल वनविभाग क्षेत्रातील रावेर वनविभाग कार्यालयात वनक्षेत्रपाल आर.जी.राणे, पत्रकार दीपक नगरे यांनी जनजागृती रॅलीचे स्वागत केले. मार्गदर्शनपर कार्यक्रमनंतर वनक्षेत्रपाल आर.जी.राणे यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर जनजागृती रॅलीस सुरवात झाली. रावेर भागात पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली.
फैजपूर येथे समारोप
सध्या वाघांचे अस्तिव सावदा , पुरी गोलवाडा, खिरोदा, या भागात पण दिसत असून या भागात देखील जनजागृती होणे आवश्यक आहे, असे फैजपूर येथील निसर्गप्रेमी अनिल नारखेडे यांनी सुचवले. त्या अनुषंगाने या भागात रॅलीचे विशेष आयोजन करण्यात आले. फैजपूर येथेच रॅलीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी अनिल नारखेडे, दीपक नगरे, नरेंद्र नारखेडे , रवींद्र फालक, अनिल वाढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी यांनी घेतले परीश्रम
वनविभाग जळगांव, वनविभाग यावल, जळगांव जनता बँक, केशवस्मृती प्रतिष्ठान, वनव्यवस्थापन समिती आणि गावकरी डोलारखेडा यांचे सहकार्य लाभले तर वन्यजीव संस्थेचे बाळकृष्ण देवरे, राहुल सोनवणे, सतीश कांबळे, वासुदेव वाढे, रवींद्र सोनवणे, अमन गुजर, नीलेश ढाके, प्रसाद सोनवणे, नाट्य कलावंत जीवन मोरे, रवींद्र फालक, सुरेंद्र नारखेडे, गौरव शिंदे, स्कायलेब डिसुझा, अलेक्स प्रेसडी, ऋषीकेश जाधव, हेमराज सोनवणे, डोलारखेडा येथील ऋषिकेश पाटील, वैभव पाटील, बंडू भोई, ऋषिकेश महाले, संजय कोळी, महेंद्र पाटील यांनी परीश्रम घेतले.
पर्यावरण कार्यकर्त्यांचा गौरव
चाळीस हजार वृक्षारोपण करून ती झाडे जगवणारे भुसावळ येथील चंद्रशेखर जंगले यांना संस्थेतर्फे वृक्षमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वनव्यवस्थापन समिती डोलारखेडा तसेच गावातील गावकरी यांचा व्याघ्रदूत हा सन्मान देऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वनविभागात नव्यानेच रुजू होऊन देखील संवेदनशील बाबी लोकसहभागाने सोडवत जंगलाचा विकास साधणारे वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांचाही गौरव झाला. वन्यजीव संरक्षण संस्था सदस्य प्रसाद सोनवणे, जगदीश बैरागी, राजेश सोनवणे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव करण्यात आला.