जागतिक शांततेसाठी विज्ञान, आध्यात्माचा समन्वय आवश्यक

0

जळगाव । जागतिक शांततेसाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न होत असतांना विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात समन्वय साधल्यास मानव जीवन सुमखय आणि मूल्याधिष्ठ बनण्यास मदत होईल. वैज्ञानिक शोधांचा उद्देश मुळात मानव समाजाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी आहे आणि आध्यात्माचा उद्देशही तोच आहे तेव्हा दोघांनी हातात हात घेऊन चालणे आवश्यक असल्याचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी व्यक्त केले. डॉ. विजय शांताराम पाटील लिखित पुस्तकांचा प्रकाशन समारंभा प्रसंगी ते बोलत होते.

‘दोघांची भूमिका महत्वाची
प्राचार्य डॉ. के. पाटील पुढे म्हणाले की, विज्ञानाचे बहुतांश शोधाचे मुळ हे शांततेमध्ये आहे. वैज्ञानिक विचार करतात, शोध घेतात त्यास शांतता, एकाग्रता हवी असते आणि आध्यात्मात ध्यान, मेडिटेशन साठी सुध्दा याच गुणांची आवश्यकता आहे. हे दोघांमधील साम्य सांगता येईल. धर्म आणि आध्यात्मिक संप्रदाय शांती, अहिंसा, प्रेम, सदाचार, सदभावना आदि मूल्यांना धारण करण्याची शिकवण देतो. अध्यात्म हा आपल्या जगण्यातील जीवनशैलीचा एक भाग आहे, असे त्यांनी सांगितले.

पुस्तक प्रकाशन
तत्पूर्वी पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्मल मीडिया पब्लिकेशनच्या संकेतस्थळाचे उदघाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, भगीरथ इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष मेजर नाना वाणी, मुकुल भाई, पुणे, विवेकानंद क्लासेसचे प्रा. संदिप पाटील, ज्येष्ठ राजयोगी शांताराम पाटील, लेखक डॉ. विजय पाटील, डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

आध्यात्मिक साहित्याची आवश्यकता
भगीरथ इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष मेजर नाना वाणी यांनी याप्रसंगी चांगल्या आध्यात्मिक साहित्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, डॉ. विजय पाटील यांच्या पुस्तकात विविध आध्यात्मिक संस्था ह्या मानवाचा मानसिक, आध्यात्मिक विकासासाठी कशा प्रकारे कार्य करीत आहेत याचा संशोधनात्मक आढावा घेतलेला आहे. आधुनिक युगात मानवाला सौख्यपूर्ण जगण्यासाठी मार्गदर्शन आणि मदतीची आवश्यकता असते. याची पुर्तता मानवतेला समर्पित विविध आध्यात्मिक संस्था करीत असल्याचे दिसून येते. मानवमात्रांचे कल्याण साधणाया या संस्था आणि त्यांच्या संस्थापकांचा परिचय होईल.