पुणे । एमआयटी-एडीटीसारख्या विद्यापीठामुळे जागतिक स्तरावर भारतीयांचा संवाद घडविण्यास मदद होईल, असे प्रतिपादन साल्ट लेक कम्युनिटी कॉलेजच्या अध्यक्ष डॉ. डेनिसी हफ्तालिन यांनी व्यक्त केले. राजबाग लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
वेस्ट मिन्स्टर कॉलेजचे अध्यक्ष डॉ. स्टीफन मॉर्गन, उटाह टेक्नॉलॉजी कॉन्सिलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचर्ड आर. नेल्सन, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, उषा कराड, एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुनिल राय व कुलसचिव डॉ. महेश देशपांडे याप्रसंगी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाच्या सीडी व पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
शिक्षण घेणे महत्वाचे
जागतिक शांततेच्या हेतूने आम्ही कम्युनिटी कॉलेज सुरू केले आहे. त्याद्वारे वैश्विक संवादाचे कार्य आम्ही करीत असतो. जागतिक दृष्टिच्या विद्यार्थ्यांनी आज स्वप्न पाहण्याबरोबरच शिक्षण घेणे महत्वाचे आहे. त्याद्वारे संपूर्ण जगात युद्धे थांबविण्यास व शांती प्रस्थापित करण्यास निश्चितच मदद होईल. खरे म्हणजे जगातील सर्वसामान्य जनतेच्या मनात हाच भाव आणि विचार आहे. आम्ही फक्त त्याला सुघटित स्वरूप देत आहोत, असे डॉ. डेनिसी हफ्तालिन यांनी सांगितले.
व्यापार्यासारखा विचार करा
दर दोन वर्षात तंत्रज्ञानामध्ये दुप्पटीने वाढ होत असते. जीवनात प्रत्येक पाऊलावर एखाद्या व्यापार्यासारखा विचार करावा. आपली गुंतवणूक किती व आपला फायदा किती झाला याचा आढावा घ्या. त्यानुसार स्वतःमध्ये सातत्याने बदल घडवीत रहा. आवड आणि जिज्ञासा हे कधीही उच्च बुद्धांकापेक्षा जास्त महत्वाचे आहे. कारण त्यामधून इच्छाशक्ती निर्माण होते. त्यातूनच ध्येय साध्य होते, असे डॉ. रिचर्ड आर. नेल्सन यांनी सांगितले.
…तर विश्व शांती नांदेल
भारतीय संस्कृती ही परंपरेशी जुळलेली असून येथे वसुधैव कुटुंबकमची परंपरा आहे. दहशतवाद, धर्म वेडेपणा व जातीयता इ. समस्यांनी मानव जात ग्रस्त आहे. मानवकल्याण साधावयाचे असेल तर त्यासाठी मनाची व विचारांची शुद्धता व त्यानुसार आचरण आवश्यक आहे. विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयानेच विश्व शांती नांदेल, असा विश्वास प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केला. प्रा. पायल शहा व प्रा. स्वप्निल शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालिका डॉ. स्वाती कराड-चाटे यांनी आभार मानले.