जेजुरी । समाजव्यवस्थेत गुरव समाज हा महत्त्वाचा घटक मानला जातो. या समाजाचा पारंपरिक व्यवसाय शिवमंदिरातील पूजा-अर्चा व धार्मिक विधींचा असला तरी काळानुसार धार्मिक विधींमधील कायदे बदलत आहेत. सध्याच्या स्थितीमध्ये समाजबांधवांना अनेक अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केवळ पूजा-अर्चा व धार्मिक विधी करून त्यावर चरितार्थ करणे आता सोपे राहिले नाही. समाजातील अर्थव्यवस्था बदलत आहे. जग झपाट्याने पुढे चालले आहे. बदलत्या काळानुसार जागतिक स्पर्धेमध्ये आपली पुढची पिढी टिकवायची असेल तर मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे काळ बदलतोय तुम्हीही बदला आणि मुलांना शिक्षण द्या, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा जेजुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई यांनी जेजुरी येथे केले.
पिंपरी -चिंचवड, पुणे शहर, जिल्हा व ग्रामीण भागातील समाज बांधवांच्या अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने जयमल्हार सांस्कृतिक भवनमध्ये गुणवंत विद्यार्थी, कार्यकर्ता मेळावा व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. खोपोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शिर्के, शिवाजीराव साखरे, अनिल तोरडमल, महेश शिर्के, डॉ. सुरेश थोरात, गोविंदराव गुरव, वसंतराव बंदावणे, अॅड. प्रिया गुरव, डॉ. वृषाली धारक, अशोक राजगुरू, गणेश पोरे आदींसह जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा साधना दिडभाई, नगरसेवक जयदीप बारभाई, बाळकृष्ण सातभाई उपस्थित होते.
शासनाने बहुजन वर्गातील घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्यांचा लाभ घेताना समाज संघटन महत्त्वाचे असते. समाजबांधवांनी संघटीत होऊन मागे राहिलेल्या बांधवाना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. पारंपरिक व्यावसायाबरोबरच आधुनिकतेची कास धरा, इतर व्यावसायामध्ये आपल्या पुढच्या पिढीने शिरकाव करण्यासाठी देवळातल्या घंटेपेक्षा शाळेतील घंटा महत्त्वाची आहे. हे लक्षात घ्या, असा सल्ला मसुरकर यांनी यावेळी दिला. अनेक मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकरराव शिर्के, सूत्रसंचालन गणेश गुरव यांनी केले. तर समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. अण्णासाहेब शिंदे यांच्यावतीने जेजुरीचे माजी नगरसेवक महेश आगलावे, अनिल बारभाई, केतन सातभाई आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.