इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित आयसीटी’वरील चर्चासत्रात तज्ज्ञांचा सूर : विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
तळेगाव । इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सर्वच क्षेत्रात उपयोगी पडत आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या प्रचंड विस्तारलेले जग जवळ येत चालले आहे. जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अंगीकारणे गरजेचे आहे, असा सूर इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी (आयसीटी) विषयावरील चर्चासत्रात उमटला.
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या बीबीए व बीसीए विभागाच्या वतीने ‘आयसीटी इन एज्युकेशन’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात अमोल धोंडसे, डॉ. रणजीत पाटील, डॉ. यशोधन मिठारे, डॉ. दीपाली सवाई, डॉ. जे. डी. टाकळकर, डॉ. प्रसन्न देशमुख, डॉ. प्रफुल्ल पवार, अतुल कहाते आदी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
चुकांकडे बारकाईने लक्ष द्या
चर्चासत्राचे दुसरे पुष्प डॉ. यशोधन मिठारे यांनी गुंफले. आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर करताना कशाला महत्त्व दिले पाहिजे आणि काय चूका टाळल्या पाहिजे, याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा, एनसी, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा, बारकोड, आयक्युसी आदी सर्व शिक्षण क्षेत्रात आयसीटीशिवाय पर्याय नाही, असे डॉ. मिठारे यांनी यावेळी सांगितले.
कवितेतून साधला विद्यार्थ्यांशी संवाद
डॉ. प्रसन्न देशमुख यांनी आपल्या भाषणात वेळ, वेग, माहिती यांचे महत्त्व पटवून दिले. तर आयआयसीएमआरच्या संचालिका डॉ. दीपाली सवाई यांनी ‘टीचर-टिचींग अँड आयसीटी’ या विषयाच्या अनुषंगाने मांडणी केली. शिक्षक आणि 21 व्या शतकातील स्मार्ट विद्यार्थी यांच्यातील समन्वयाचे माध्यम म्हणून आयसीटीकडे पाहिले पाहिजे. तर जे. डी. टाकळकर यांनी कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत शेतीचे अभंग, उद्योगातला नटसम्राट, विमल लिमये यांच्या ‘घर असावे घरासारखे…’ या कवितेचा आधार घेत नोकरी, निरोप यातील वास्तव मांडले.
अध्यापनासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा
समारोप सत्रात या चर्चासत्राविषयीच्या भावना विद्यार्थी, प्राध्यापकांनी व्यक्त केल्या. प्रभावी अध्यापनासाठी महाविद्यालयात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत. आणखी माहिती तंत्रज्ञान विषयक अद्ययावत यंत्रसामुग्री पुरविली जाईल, असे प्राचार्य डॉ. बाळसराफ यांनी सांगितले. भारतात माहिती तंत्रज्ञानाची महाक्रांती घडत आहे. शैक्षणिक संस्था, बँका, तसेच सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी याचा वापर प्रचंड वाढला आहे. महाविद्यालयांना अत्याधुनिक अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. त्याचा प्राध्यापक व विद्यार्थी चांगला वापर करीत आहेत, असे उपप्राचार्य डॉ. मलघे यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ यांनी केले. चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका उपप्राचार्य डॉ. एस. के. मलघे यांनी स्पष्ट केली. आभार विभागप्रमुख व संयोजिका प्रा. विद्या भेगडे यांनी मानले. चर्चासत्र यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी आदींनी सहकार्य केले.