जागतिक स्पर्धेसाठी संघात बदल नाही

0

मुंबई। आगामी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात कुठलाही फेरबदल करणार नसल्याचे भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्श आदिल सुमारीवाला यांनी स्पष्ट केले. भुवनेश्‍वर येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना भारतीय संघात स्थान देण्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी होत होती. या तिघा खेळाडूंनी जागतिक स्पर्धेसाठी असलेला पात्रतेचा निकष पूर्ण केला नसल्यामुळे त्यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे संघटनेच्या या निर्णयाबाबत पुनर्विचार होणार नसल्याचे सुमारीवाला यांनी सांगितले.

सुधा, अजयकुमार, चित्राला नकार
खेळाडूंना वगळण्यासंदर्भात सुमारीवाला म्हणाले की, या तिघांनी भुवनेश्‍वरमध्ये सुवर्णपदक जिंकले असले तरी त्यांची कामगिरी मात्र ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय विक्रमापर्यंतही पोहचणारी नव्हती. या खेळाडूंनी पात्रतेचा निकष जरी पार केला असता, स्पर्धेसाठी कोणाला पाठवायचे हा संघटनेचा अधिकार आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही छोटी स्पर्धा नाही. या स्पर्धेतला अनुभव वेगळा असतो. जगातील सर्वोत्तम धावपटू त्यात सहभागी होत असतात. त्यामुळे ठोस कामगिरी न करणार्‍या खेळाडूंना स्पर्धेकरिता पाठवणार नाही. महिलांच्या 3000 मीटर स्टिपलचेस शर्यतीतील विजेती सुधा सिंग, अजयकुमार सरोज (1500 मीटर) आणि पी. यु. चित्रा (1500 मीटर) यांनी भुवनेश्‍वरमध्ये सुवर्णपदक जिंकूनही 24 जणांच्या भारतीय संघात त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.