जागतीक वारसेचा दर्जा लाभलेली पश्‍चिम घाटातील जैवविविधता धोक्यात

0

ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांचे मत 

13 व्या वसुंधरा महोत्सवाची सांगता

पुणे : ईशान्य भारत आणि पश्‍चिम घाट हे जैवविविधतेच्या दृष्टीने केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगाकरती ग्लोबल हॉटस्पॉट म्हणून परिचित आहे. हे दोन्ही प्रदेश सहा राज्यांत विभागलेले असून त्यात महाराष्ट्र राज्यदेखील प्रामुख्याने येते. पंरतू जागतीक वारसेचा दर्जा लाभलेली पश्‍चिम घाटातील ही जैवविविधता धोक्याच्या टप्प्यात आली असल्याचे परखड मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी व्यक्त केले. 13 व्या वसुंधरा महोत्सव सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते डॉ. बाचुळकर यांना ‘ग्रीन टिचर सन्मान’, धुळे येथील ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ चैत्राम पवार यांना ‘किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ तर वसुंधरा मित्र हा संस्थेसाठीचा सन्मान मल्टि जी. पी. एस. डब्ल्यू. एम. युनिटला प्रदान करण्यात आला. जनार्दन हुलगी यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष माधव चंद्रचूड, गौरी किर्लोस्कर, अतुल किर्लोस्कर, वीरेंद्र चित्राव, आदित्य कौशिक आदी मान्यवर उपस्थित होते.

सरकार उदासीन

शिवाजी महाराजांच्याकाळापासून पश्‍चिम घाटाचे महत्त्व असून त्यास आपण सह्याद्री म्हणून ओळखतो. राधानगरी, चांदोली, कोयना अभयअरण्ये आणि कासचे पुष्पपठार यांना जागतीक दर्जाप्राप्त झाला आहे. पंरतू एवढी समृद्ध आणि विविधतेने नटलेली जैव विविधता धोक्यात आली असून विकासाच्या नावाखाली आपण त्याच्या र्‍हासास कारणीभूत ठरत आहोत, असे डॉ. मधुकर बाचुळकर यांनी सांगितले. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ किंवा कस्तुरीरंगण यांचा याबाबतचा अहवाल सरकार दफ्तरी आला असून त्याबाबत मात्र सरकार उदासीन आहे. गौरी किर्लोस्कर यांनी 13 व्या वसुंधरा महोत्सवाचा आढावा घेतला. अतुल किर्लोस्कर यांनी प्रास्ताविक केले.

अन् कामाला दिशा मिळाली

जेव्हा बारीपाड्यात काम सुरू केले त्यावेळी कमालीचे द्ररिद्रय, व्यसनाधिनता, अज्ञान आणि अंधश्रद्धेचा पगडा होता. काम सुरू करण्याआधी दोन वर्षे गावाला एकत्र आणण्यातच गेली. काम सुरू झाले पंरतू त्यास योग्य दिशा मिळत नव्हती. अशातच देशस्तरावर काम करणार्‍या वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या लोकांच्या संपर्कात आलो आणि कामाला दिशा मिळाली. लोकसहभागातून काम उभे केले. कुर्‍हाड बंदी आणि चर्‍हाई बंदी सारखे नियम आखून दिले आणि सुमारे 11 हजार हेक्टर जंगल उभे केले. वनभाजी महोत्सवसारखे उपक्रम हाती घेतले. आणि जंगलाचे महत्त्व स्थानिकांच्या लक्षात आणून दिले, असे चैत्राम पवार यांनी सांगितले.