जागतीक स्तनपान सप्ताहानिमित्त झेडपीत पाककृती स्पर्धा

0

जळगाव। महिला व बालकल्याण विभागातर्फे दरवर्षी 1 ते 8 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह राबविण्यात येत असते. दरवर्षी यावर्षीही स्तनपान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सप्ताहानिमित्त जिल्ह्याभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी 2 रोजी जिल्हा परिषदेतील शाहू महाराज सभागृहात फूड न्युट्रीशियन व महिला बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमान पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गर्भवती, स्तनदा मातेसाठी आणि बालकांसाठी आवश्यक आहाराचा समावेश होता. जिल्ह्याभरातील महिलांनी या स्पर्धेत वेगवेगळे पदार्थ बनवल्या. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण, अन्न प्रशासन विभागाचे सुरेंद्रसिंग, महिला व बालकल्याण अधिकारी आर.आर.तडवी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे संदीप देवरे, दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते.

आजचे कार्यक्रम
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त आज गुरुवारी 3 रोजी यावल येथे अन्न प्राशन कार्यक्रम, 6 महिन्याच्या बाळासाठी कोणते आहार आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अर्ध वार्षीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी 4 रोजी रावेर तालुक्यातील लोहारा येथे तर शनिवारी 5 रोजी पाल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पौष्टीक आहार देण्याचा प्रयत्न
स्पर्धेच्या माध्यमातून महिलांनी विविध भाज्यांचे मिश्रण करुन पदार्थ बनविले. या पदार्थाचा वापर जर अंगणवाडीच्या माध्यमातून महिलांना व बालकांना देण्यात आला तर कुपोषण व महिलांच्या आरोग्याविषयी प्रश्‍न दुर होण्यास मदत मिळणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून नवनविन खाद्य पदार्थ उदयास येऊन त्यांचा वापर आहारात करुन पोष्टीक आहार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

यांना मिळाले पारितोषीक
अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यात रंजुबाई भगवान इंगळे कानळदा यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिळाले. त्यांनी शेवगापानाची भाजी, कळीथ भाजी पोळी बनविल्या होत्या. द्वितीय पारितोषीक गौरी महिला बचत गट असोदा यांना मिळाला आहे. त्यांनी कळण्याची भकारी, भरीत व पूरी बनविले होते.
तृतीय पारितोषीक ललिता सोमा सपकाळे डोमगाव यांना मिळाला आहे. त्यांनी अमायलेजयुक्त तिखट उपमा व पौष्टीक खिचडी बनविली होती. दहा महिलांना उत्तेजनार्थ पारितोषीक तर सहभागी महिलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले आहे.