जागृती सोसायटीतील तरूणाची आत्महत्या

0

जळगाव। सकाळीच दारू पिवून आलास का? अशा शब्दात वडील रागावल्याने रामानंदनगर परिसरातील जागृती सोसायटीतील तुषार अर्जुन सोनार या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दारु पिऊन आल्याने वडील रागविले
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गेल्या आठवडाभरापासून नळांना पाणी आलेले नव्हते. मात्र, शनिवारी जागृती सोसायटीत नळाला पाणी आल्याने अर्जुन सोनार यांचे कुटुंब पाणी भरत होते. त्यावेळी सोनार यांनी मुलगा तुषार याला दुकानावरुन कोलगेट घेवून येण्यास सांगितले. दरम्यान, दुकानावरून येतांना तो दारु पिवून आल्याचे पाहून वडीलांनी तु इतक्या सकाळी पिवून आला का? असे विचारुन रागावले. त्यानंतर तो सरळ वरच्या मजल्यावर गेला.

पाणी भरणे झाल्यानंतर तुषारला यायला का वेळ लागतो आहे म्हणून वडील त्याला पाहण्यासाठी गेले असता आतून दरवाजा बंद होता व तो आवाजाला प्रतिसादही देत नव्हता. खिडकीतून डोकावून पाहिले असता तुषार याने दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने गळफास घेतल्याचे पाहून कुटूंबियानी हंबरडा फोडला.

रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी
घरातील लोकांनी दरवाजा तोडून तुषारला खाली उतरविले. यानंतर काहींनी परिसरातील डॉक्टरला बोलावले असता त्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषीत केले. त्यानंतर रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल काशिनाथ कोळंबे व रवींद्र पाटील हे पोहाचल्यानंतर त्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. दुपारी दोन वाजता शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

बहिणीचा प्रचंड आक्रोश
तुषार याला शिवा व भरत हे दोन भाऊ तर अर्चना राजेंद्र सोनार (रा.जळगाव) व ललिता वाघ (रा.धुळे) या दोन बहिणी आहेत. बहिण ललिता येईपर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयातच ठेवण्यात आला होता. जिल्हा रुग्णालयात भावाचा मृतदेह पाहताच त्यांनी प्रचंड आक्रोश केला. वडील अर्जुन सोनार यांनी तिला सावरले. वडील,भाऊ, अन्य नातेवाईकांनीही यावेळी आक्रोश केला.मेहुणे राजेंद्र सोनार यांनी त्यांना सावरले. तुषार, शिवा व भरत या तिन्ही भावांची गुजराथ स्वीट मार्टजवळ आशिर्वाद पान टपरी आहे. याशिवाय त्यांच्याकडे तीन वाहने असून त्याद्वारे टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचाही त्यांचा व्यवसाय चालतो. वडीलही पानटपरीचा व्यवसाय सांभाळतात.