जाणता राजा महानाट्याचा भव्य उद्घाटन सोहळा

0

तळेगाव दाभाडे : छत्रपती श्री शिवशंभू स्मारक समिती व लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे प्रतिष्ठान मावळ यांच्या संयुक्त सहकार्याने तळेगाव दाभाडे येथे शनिवार दि. 10 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बाबासाहेब पुरंदरे लिखित, दिग्दर्शित व महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे निर्मित, ‘जाणता राजा’ एक ऐतिहासिक महानाट्याच्या भव्य सोहळ्याचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीषजी बापट यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. या निमित्ताने बाबासाहेब पुरंदरे यांचा मावळवासीयांच्या वतीने भव्य जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दि. 10 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान रोज सायंकाळी 6.00 वाजता महानाट्याचा प्रयोग होणार असून दररोज सुमारे 10,000 प्रेक्षकांची बैठक व्यवस्था केली आहे. या सहा दिवसाच्या कालावधीत अनेक मान्यवर या महानाट्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजयजी शिवतारे, दिलीपजी कांबळे, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, शरद सोनवणे यांची उपस्थिती लाभणार आहे.

तळेगाव दाभाडेच्या ऐतिहासिक भूमीत ब्राँझ धातूतील 14 फूट उंचीचे एकत्रित भव्य शिल्प साकारले जाणार आहे. वैभवशाली इतिहासाची आठवण, देश, धर्म व समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा व स्फूर्ती नवीन पिढीला यातून मिळणार आहे. जाणता राजा महानाट्याचे स्वागताध्यक्ष आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, निमंत्रक मा. आमदार कृष्णराव भेगडे, शिवशंभू स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष भेगडे पाटील व लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांनी मावळातील शिवप्रेमनीं या महानाट्याचा आनंद घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन केले आहे.