जाणिवेच्या हुंदक्यातून आजच्या स्त्रीमनाची कैफियत!

0

ज्योती थोटे- गुळवणे

बंदिनी
स्री ही बंदिनी
ह्रदयी पान्हा नयनी पाणी
जन्मोजन्मीची कहाणी
युगे युगे भावनांचे धागे
जपावया मन तुझे जाग.
बंधनी हे रेशमाची
सांभाळी तुच मानिनी…आज 21 व्या शतकातही स्त्री स्वातंत्र्य या विषयावर पुरोगामी महाराष्ट्रात आपल्याला चर्चा करायला लागते यातच सर्व काही सामावले आहे. पूर्वीच्या काळातील स्त्रियांच्या तुलनेत आताच्या स्त्रीत खूप बदल झालेला आहे असे दिसते, पण ते वास्तव नाही. आम्ही आधुनिकीकरणाने वरकरणी बदल जसे पोशाख, फॅशन्स आदी स्वीकारले तरी मनाचे, विचारांचे आधुनिकीकरण आलेले नाही. रुढी, परंपरा कायम राखण्याची सर्व जबाबदारी ही स्त्रीचीच आहे, असे पुरुषच नव्हे स्त्रियाही मानतात. दारु पिऊन गटारात लोळून पत्नीला रोज मारहाण करणार्‍या दारुड्या पतीसाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत, कोकिळाव्रत हौसेन करतात. याला काय म्हणायचे? पतिव्रता राहण्याची स्त्रीकडूनच अपेक्षा. पतीने का नाही पाळायचे एकपत्नीव्रत? या दुटप्पी न्यायाबद्दल आम्हाला आजही चीड येत नाही. आज मुली उच्चशिक्षण, पदव्या घेत आहेत. मुलांच्या बरोबरीने जास्त संघर्ष करुन आयुष्याची महत्वाची वर्षे शिक्षण घेण्यात व्यतित केलेली असतात. पण लग्नाच्या बोहल्यावर चढतांना हुंडा असतोच. या उच्चशिक्षित मुलींचा लग्नसमारंभही तितकाच जंगी असतो. आम्ही लग्नपत्रिकेत वधूचे शिक्षण, डिग्री बघतो व तिच्या बापाने मोजलेल्या हुंड्याचे आम्ही साक्षीदार होऊन शुभमंगल सावधान करुन येतो. आजही कुठल्याच जुन्या वाईट प्रथा मोडकळीस आलेल्या नाहीत उलट त्या व्यापक रुपाने समोर येत आहेत. यावर सुशिक्षित म्हणून मिरवणार्‍या वर्गाने विचार करायला हवा. कारण, त्यांचा आदर्श ग्रामीण समाज घेत असतो व ऐपत नसतांनाही प्रसंगी शेतीचा तुकडा विकून, सावकारी कर्ज काढून मोठ्या तामझामात लेकीचे लग्न लावतो. हे आता कुठंतरी थांबलच पाहीजे.
बरं हा लग्नाचा बाजार बघता जसजसे वराचे शिक्षण, डीग्री जास्त तसतसे भाव वधारत जातात. क्लासवन अधिकारी, क्लास टू अधिकारी, तहसीलदार, तत्सम अधिकारी, डॉक्टर, प्राध्यापक असल्यास भाव लाखांत मावत नाहीत म्हणून सोन्याच्या तोळ्यांत ठरवले जातात. सामान्यपणे जरा बरे पैसे खर्चून विकत घेतल्यावर जनावरांना स्वतःच्या घरी नेले जाते. परंतु, माणसांच्या बाजाराची रीतच न्यारी आहे.
षरींहशीी ळप ींहश ज्ञळींलहशप ळी ींहश षळीीीं र्ींर्ळीीरश्र श्रशरीपळपस षेी लहळश्रवीशप ेप सशपवशी र्शिींरश्रळीूं…असे आपण फक्त वाचतो पण किती पुरुष अशी कृती करतात? आजच्या काळात प्रत्येक काम दोघांना येणे क्रमप्राप्त आहे व अन्न बनवण्यासारखी मूलभूत गोष्ट तर अग्रक्रमाने आलीच पाहिजे. शिजवलेले अन्न कुणी खावे? तर ज्याला अन्न बनवण्याच कौशल्य येते त्यांनी! वडिलांनी जर रोज स्वयंपाकघरात थोडा वेळ जरी मदत केली तर पुढच्या पिढीवर हे संस्कार आपसूकच रुजतील.
स्त्री शिकली, सवरली, स्वायत्त झाली, कमवायला लागली पण तिने नव्या कामांचा भार खांद्यावर अजून वाढवून घेतला. कित्येक घरांमध्ये दोघेही सारख्या कामावर, सारख्या वेळेला जात असतांना किती पुरुष घरातल्या जबाबदार्‍यांचा भार आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतात याची समीक्षा ज्याची त्यांनी करावी. काही घरांमध्ये बदलाचे सकारात्मक चित्र दिसतेय ही जमेची बाजू. तिने आणलेल्या पगारावर मात्र, संपूर्णपणे यांचाच हक्क असतो. नाही म्हणायला तिच्या थोड्याफार हौसीमौजी पुरवल्या जातात पण पगाराचे संपूर्ण व्यवस्थापन असो की, एखादा मोठा निर्णय, यामध्ये तिचा सहभाग घेतला जात नाही. व्यवस्थेने स्त्रीला संपत्तीसंचयापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले आहे म्हणूनच तर स्त्रियांच्या ड्रेसकोडमध्ये कुठेच त्यांना पॉकेट (खिसा) नाही. अनेकदा शाळेत मुलांना तुझे वडील काय करतात? असा प्रश्न विचारला जातो. त्यावर नोकरीला आहेत, उद्योजक आहेत, शेतकरी आहेत अशी उत्तरे मुले देतात पण हाच प्रश्न आईच्या बाबतीत विचारल्यावर आई काहीच करत नाही, घरीच असते किंवा हाऊसवाईफ असे उत्तर येते. तिने सर्वांच्या खाण्यापिण्याची, मुलांच्या संगोपनासाठी, नवर्‍याचे सगळे नीटनेटके ठेवणे, त्याची मर्जी सांभाळणे, पाहुण्यांचा पाहुणचार, सासू-सासर्‍यांची सेवा यासाठी घेतलेल्या अपार कष्टांची साधी मोजदादही घेतली जात नाही. उलट तू घरीच तर असतेस ना, असे टोमणे मारून तिचे मानसिक खच्चीकरणे केले जाते. तिने जर खरेच काहीच केले नाही तर घराबाहेर पडणारे पुरुष, मुले यांचे काय होईल याचा जरुर विचार करावा. स्त्रीमधील आई जिवंत असते म्हणून कित्येक संसार सुरळीत चालू आहेत, पण या दुय्यम समजण्याच्या मानसिकतेला बुरसट धर्मव्यवस्था कारणीभूत आहे. आजही मनुस्मृतीचे समर्थक आहेतच. ती कायमस्वरूपी रहावी यासाठी ते प्रयत्नरत आहेत. ही मनुस्मृती समस्त स्त्रियांना अवर्ण, अतिशूद्र ठरविते. ज्यात मनु म्हणतो,
पिता रक्षती कौमार्य।
भ्रर्ता रक्षती यौवने।
स्थविरे पुत्रा।
न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हती।
बालपणी वडील, यौवनात पती आणि म्हातारपणी मुलाने स्त्रीचे रक्षण करावे. पुढे तर तो फारच खाली घसरतो. समर्थक आजसुद्धा शबरीमाला मंदिर प्रवेश, शनी मंदिर किंवा हाजीअली असा भेद करतात.
प्रेम ही एक अलवार नैसर्गिक भावना असते, पण तीच अनेकींसाठी शाप ठरत आहे. एकतर्फी प्रेमातून हिंगणघाटसारख्या असंख्य घटना बघितल्या तर अंगाचा थरकाप उडतो. अशा प्रकारांतून तिचे स्वातंत्र्याचे पंख छाटून तिचे आयुष्य मातीमोल होत चालले आहे. पुरुषांनी आता नकार पचवायला शिकायलाच हवे. काही पुरुषांना वाटते की, महिलांना आता जास्तीचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्या याचा गैरफायदा घेत आहेत, पण अशांनी हा जरूर विचार करावा की, एखाद्या मुलीने एकतर्फी प्रेमातून अशी घटना केली का? स्त्रिया स्वतःच्या जिद्दीच्या, मेहनतीच्या जीवावर अनेक क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. पण पुरुषी मानसिकतेला हे सहन होत नाही. ज्या कार्यालयात महिला प्रमुख आहेत अशा ठिकाणी तिला अनेक अपमानास्पद परिस्थितीतीला सामोरे जावे लागते.
आज स्त्रियांचा वावर सर्व क्षेत्रांत जरी होतांना दिसत असला तरी राजकीय क्षेत्रात म्हणावा तसा नाही. खरे तर जीवनावश्यक वस्तूंची महागाई, समाजात मिळणारे शिक्षण, कामधंद्याची संधी, स्त्रियांवरील अत्याचार, आरोग्य सुविधा, निवारा, कुपोषण इ. असंख्य प्रश्न हे राज्यकर्त्यांवरच अवलंबून असतात. त्यामुळे मला राजकारणाशी काही देणेघेणे नाही, असे म्हणणे आपल्याला परवडणारे नाही. कारण 50% लोकसंख्या असणार्‍या स्त्रियांना संसद, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% देय असणारे प्रतिनिधित्वसाठीची उमेदवारी, तिकीटेच दिली जात नाहीत. आपण गावोगावी महिला सरपंच निवडून आलेल्या बघतो. त्या फक्त नाममात्र असतात.विकासात्मक धोरणावर त्यांना एक जरी प्रश्न विचारला तर त्या नवरोजींकडे बघतात. त्याप्रमाणेच सभापती, नगराध्यक्षा, महापौर यांना आपणही निवडून देतो ते त्यांच्या नवर्‍यामुळेच. स्रीच्या मुखवट्याआड भूमिका वठवणारा चेहरा हा एखाद्या पुरुषाचाच आहे हे आपण ग्राह्य धरलेले असते.
स्त्री स्वातंत्र्याचा विचार करता सगळ्यांत खालच्या पातळीवर ग्रामीण भागातील भगिनी आहेत. ज्या सणवार, व्रतवैकल्ये, उपास, नवस मनोभावे करतांना स्वतःच्या खालावत जाणार्‍या आरोग्याची किंमत मोजतात. जी गुलामीची बंधने आहेत ती त्यांना अलंकार वाटतात. मातृत्व ही निसर्गाने स्त्रियांना दिलेले वेगळेपण आहे. स्त्रियांना दिवसभर प्रचंड कष्टाची कामे करावी लागतात तरीही ती थोडे जरी आधुनिक विचारांप्रमाणे वागायला गेली की, भावकी काय म्हणेल, गावातले लोक काय म्हणतील, असे सांगून तिची प्रगती तिथेच खुंटली जाते. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा म्हणून त्याच्या जन्मानंतर स्वागतात पेढे देतात तर मुलीच्या जन्मानंतर नाराजी असते. त्यावेळी जिलेबी देतात. घरातच हा भेद पोसला जातो आहे. अनेकप्रसंगी हा भेदभाव होतो. स्त्रीनेच फक्त चूल आणि मूल, बघावे ही धारणा आता कालबाह्य समजावी लागेल. समानतेच्या पायावरच नवीन व्यवस्था उभारावी लागेल. समानतेचा प्रवास पुरुषांच्या मदतीशिवाय शक्यच नाही. जाणिवेचे मोरपिस हे प्रत्येक पुरुषाजवळ असावे. सावित्रीमाईंना जोतिबांनी जसा हात दिला तसा हात देण्याची आजही गरज आहे. एकमेकांना समान पातळीवर समजून घेतल्याने संवेदनाशीलता वाढेल, भावनिक जवळीक वाढेल व परस्परांविषयी विश्वासाचे घट् नाते तयार होईल. स्त्रियांना केवळ शारीरिक व मानसिक गरजा भागवणारे यंत्र म्हणून न वागवता भावनिक व बौद्धिक भागीदाराची प्रतिष्ठा द्यावी लागेल. तिचे माणूस असणे समजून घ्यावे लागेल. तरच स्री-पुरुषातील दरी मिटवून मानवतेकडे वाटचाल होऊ शकेल.