मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ट्वीट करून देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय आज जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. दरम्यान दुपारी १२ वाजेनंतर मोदींनी सोशल मिडिया तसेच इतर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संवाद साधत भारत अंतरीक्ष क्षेत्रात जगात चौथा देश ठरल्याचे जाहीर केले. मोदींनी या कामगिरीबद्दल भारतीय वैज्ञानिकांचे आभार मनात त्यांच्या कार्याला सलाम केला. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ‘मिशन शक्ती’साठी डीआरडीओला शुभेच्छा दिल्यात. त्यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले आहे. सोबतच त्यांनी या कामाचे श्रेय मोदींनी घेऊ नये असे अप्रत्यक्ष सांगत मोदींना ‘जागतिक रंगभूमी दिना’च्याही शुभेच्छा दिल्या आहेत.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही आपली प्रतिक्रिया देताना ‘मोदी जवळपास तासभर टीव्ही स्क्रीन व्यापून राहिले, त्यांनी देशाचे लक्ष बेरोजगारी आणि ग्रामीण समस्यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांपासून हटवले’ अशी टीका केली.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही डीआरडीओला शुभेच्छा देताना या मिशनचा पाया यूपीए सरकारच्या काळात २०१२ साली घालण्यात आल्याचं सांगितलंय. भारतासाठी हा एक गौरवाचा क्षण असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.