जात,धर्म,भाषा,वंशापेक्षा देश मोठा…!

0

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या भिमसृष्टीचे उद्घाटन व माता रमाई पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ

। पिंपरी चिंचवड प्रतिनिधी।

जात, धर्म, भाषा व वंशापेक्षा देश मोठा असून आपण सर्व प्रथम व शेवटीही भारतीय आहोत. या मूलभूत तत्वावर आधारीत संविधानाचे निर्माण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय तथा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. बुधवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या भिमसृष्टीचे उद्घाटन व माता रमाई पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री आठवले यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहूल जाधव होते. यावेळी खासदार, श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, भन्ते, डॉ. राहुल बोधी, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, आयुक्त श्रावण हर्डीकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे,शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या गीता मंचरकर, डॉ.वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर – शिलवंत, अनुराधा गोरखे, कमल घोलप, आशा धायगुडे – शेंडगे, निकिता कदम, नगरसदस्य राहुल भोसले, समीर मासुळकर, संतोष कांबळे, सागर आंगोळकर, बाबासाहेब त्रिभुवन, संतोष लोंढे, शैलेश मोरे, स्विकृत सदस्य माऊली थोरात, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे, माजी नगरसदस्य लक्ष्मण गायकवाड, रामचंद्र माने, शेखर ओव्हाळ, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधानामुळे सर्व जाती धर्म एकत्रित
रामदास आठवले म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या आशा आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असून नागरिकांसाठी बस सेवा, झोपडपटटीतील नागरिकांना घरकुलच्या माध्यमातून निवारा देण्याचे काम होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान लिहून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवण्याचे काम केले आहे. महानगरपालिकेच्या वतीने ब्रॉझ धातूचे 19 म्युरल्स बसविण्यात आल्यामुळे महापालिका क्षेत्रातीलच नव्हे तर इतर जिल्हा किंवा शहरातील सर्व नागरिकांना बाबासाहेबांच्या कार्याची ओळख होणार असल्याचेही ते म्हणाले. आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, बाबासाहेंबाच्या जीवनातील विविध पैलूंचा आढावा घेणारे म्युरल्स महापालिकेने साकारल्यामुळे शहरात प्रबोधनपर पर्यटन स्थळ निर्माण झाले आहे.

महापौर राहूल जाधव म्हणाले, बाबासाहेबांच्या जीवनावरील ब्रॉझ धातूचे 19 म्युरल्स उभारण्यासाठी महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी तसेच पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. भिमसृष्टीसाठी सुमारे 8 कोटी 50 लाख इतका खर्च झालेला आहे.त्याचा लाभ सर्व नागरीकांना होणार आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात भोसरी येथे प्राधिकरणाच्या सेक्टर क्र.11 मध्ये 5 एकर जागेत संविधान भवनाचे निर्माण करण्यात येणार असून त्यामध्ये भव्य अभ्यासिका तयार करण्यात येणार आहे यातून नागरिकांचे प्रबोधन होणार असल्याचेही ते म्हणाले. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, महापालिकेच्या वतीने भिमसृष्टीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जीवनातील विविध पैलूंचे 19 म्युरल्स उभारुन सर्व समाजाच्या मनातले स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. तसेच माता रमाईंच्या पुतळयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून शासनाच्या विविध खात्यांच्या परवानगीने लवकरच पुतळा उभारण्यात येणार आहे.