जातपडताळणी दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

0

जळगाव । विविध शैक्षणिक अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले असून नवीन अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. आवश्यक कागदपत्राशिवाय प्रवेश प्रक्रिया पुर्ण होत नाही. वैद्यकिय, अभियांत्रिकी सोबतच इतर अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र हे धुळे येथे मिळत होते मात्र गैरसोय टाळण्यासाठी जळगाव येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. मात्र, या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

जातपडताळणी कार्यालयात अधिकारी उपस्थित राहत नसल्याने अडचणी
अशी तक्रार शिवसेना महानगर शाखेतर्फे जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जातपडताळणी कार्यालयात अधिकारी कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने समितीचे नियमित कामकाज होत नाही. त्याचा फटका विद्यार्थ्यांसह नोकरदारांनादेखील बसत आहे. अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे नुकसान होत असल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करून कामाची शिस्त लावण्याची मागणी शिवसेना महानगरतर्फे करण्यात आली. या वेळी महानगरप्रमुख गणेश सोनवणे, कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. या वेळी मानसिंग सोनवणे, सोहम विसपुते, राहुल नेतलेकर, शोभा चौधरी, ज्योती शिवदे, नाना भालेराव, खुशाल सूर्यवंशी, राहुल शिंदे, विजय राठोड, गणेश गायकवाड, मोहन यादव उपस्थित होते.