जातीच्या दाखल्यांसह नॉन क्रिमेलेयर आता प्रांतांच्या डिजिटल स्वाक्षरीने

0

मुक्ताईनगर, बोदवड आणि भुसावळ तालुक्यातील सुविधा केंद्र आणि ई सुविधा केद्राच्या चालकांना बैठकीत प्रांतांच्या सूचना

भुसावळ- प्रांताधिकारी कार्यालयातून देण्यात येत असलेले नॉन क्रीमेलीयर आणि जातीचा दाखला आता डिजिटल स्वरूपात देण्यात येणार असून या दाखल्यावर आता प्रांताधिकार्‍यांची डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. यापूर्वी राष्ट्रीयत्व दाखला, उत्पन्न दाखला आणि डोमेसाईल दाखले डिजिटल करण्यात आले होते तर आता दोन्ही डिथजटल करण्यात आल्याने महसूलच्या परीसरात दलालांची चालणार्‍या मनमानीला आता आळा बसणार आहे. भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी ही माहिती केंद्र चालकाना दिली. यावेळी भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर येथील केंद्र चालकांची उपस्थिती होती.

प्रांताधिकार्‍यांनी बैठकीत दिली माहिती
प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी दुपारी 12 वाजता विभागातील मुक्ताईनगर, बोदवड आणि भुसावळ तालुक्यातील सुविधा केंद्र आणि ई सुविधा केंद्राच्या चालकांची बैठक घेतली. यावेळी बोदवड येथील तहसीलदार रवींद्र जोगी उपस्थित होते. यावेळी प्रांत डॉ. चिंचकर यांनी उपस्थितांना सांगितले की, यापूर्वी ज्या प्रमाणे राष्ट्रीयत्व दाखला, उत्पन्न दाखला आणि डोमेसाईल दाखले डिजिटल दाखले डिजिटल झाले आहे. त्याचधर्तीवर आता नॉन क्रिमेलीयर आणि जातीचा दाखला ऑनलाईन होत आहे. यामुळे गुरूवारपासून प्रांताधिकारी कार्यालयात तीन्ही तालुक्यातून दाखले पाठविणे बंद करावेत. जिल्ह्यात डिजिटल दाखले झाले असून फक्त भुसावळ तालुका त्यात मागे होता त्यामुळे आता भुसावळ तालुक्यातही डिजिटल दाखले देण्यात येणार आहेत. यामुळे दाखल्यांसाठी तहसील कार्यालयाच्या परीसरात दाखल्यांचे काम करणार्‍या दलालांवर सुद्धा यामुळे अंकुश येणार आहे. त्यांची मनमानी थाबणार आहे. दाखला घेण्यासाठी येणार्‍यांची आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. बैठकीला तिन्ही तालुक्यातील सुमारे 35 केद्र संचालकांची उपस्थिती होती. प्रांताधिकारी कार्यालयात जे दाखल्यांचे प्रकरणे आहे, ते काढून झाल्यावर एकही दाखला हा प्रांत कार्यालयात पोहोचणार नाही. त्यावर थेट डिजिटल स्वाक्षरी होणार आहे. यावेळी बोदवड तहसीलदार जोगी यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले.

जातीच्या दाखल्यांना लागणार मुळ कागदपत्रे
जातीच्या दाखल्यांसाठीपूर्वी झेरॉक्स कागदपत्रेही जोडल्यास चालत होते मात्र आता जातीच्या दाखल्यासाठी अर्जदारास मुळ कागदपत्रे (ओरीजनल) जोडावी लागणार आहे. प्रकरण सबमीट झाल्यावर संबंधित अर्जदारास त्याचे मुळ कागदपत्रे परत मिळणार असून झेरॉक्स् प्रति जोडता येणार आहेत.