जातीधर्मापलिकडे जावून एकात्म आणि एकसंघ होण्यासाठी महापुरूष प्रेरकशक्ती

0

डॉ. श्रीपाल सबनीस : शिवजयंतीनिमित्त शांताई संस्थेच्या विविध पुरस्कारांचे वितरण

येरवडा । महापुरूष हे कोण्या एका जातीचे अथवा धर्माचे नसतात. सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचा जीवनसंघर्ष असतो. त्यामुळे जातीधर्मापलिकडे जावून एकात्म आणि एकसंघ होण्यासाठी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासह अनेक थोर महापुरूष हे प्रेरकशक्ती आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. शांताई संस्थेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित प्रबोधनपर व्याख्यान आणि विविध पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सबनीस बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यावेळी उपस्थित होते. शांताई संस्थेचे संचालक अ‍ॅड. संपतराव कांबळे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. बापूसाहेब कांबळे, रश्मी शागिरल यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र एकसंघ राहणे आवश्यक
छत्रपती शिवाजीमहाराजांनी माणुसकीच्या मूल्यांवर आधारित स्वराज्य निर्माण केले होते. सर्व जातीधर्माचे सहकारी त्यांनी सोबत घेतले होते. त्यामुळे वर्तमानातील प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच भविष्यकाळ सुधारण्यासाठी शिवाजीमहाराजांच्या कर्तृत्वातील आणि इतिहासातील प्रेरक सूत्र स्विकारले पाहिजे, असे डॉ. सबनीस यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत जातीजातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होऊन फडफडणारा, तुटणारा, फूटणारा महाराष्ट्र एकसंघ राहणे अत्यंत आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सत्कार
शांताई संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून भरीव योगदान देणार्‍या तीन मान्यवरांना पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. शिक्षणमंडळाचे माजी अध्यक्ष आणि येरवडा येथील श्रीशिवराय नागरी पतसंस्थेचे संस्थापक अरूण वाघमारे यांना यावेळी जाणता राजा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे नगरसेविका हिमाली कांबळे यांना जिजाऊ आणि स्व. वरूणिका संपत कांबळे स्मृति पुरस्कार प्रतिष्ठीत सामाजिक कार्यकर्त्या जेनिस सोमजी यांना देऊन यावेळी सन्मानीत करण्यात आले.

मोफत शूजचे वाटप
बंडगार्डन येथील जॉगर्स पार्क येथे शांताई संस्थेच्या वतीने समाजातील गरजू, अनाथ, निराधार, वंचित, शोषित, आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना आणि महिलांना बाटा कंपनी व संभव फाउंडेशन यांच्या संयोगाने हॅपी स्टेटस या कार्यक्रमाच्या अंतर्गत मोफत शूज आणि चप्पल यावेळी वितरीत करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने आयोजित ब्युटी पार्लर, शिवणकाम प्रशिक्षण, आणि जनरल ड्युटी असिस्टंट (असिस्टंट नर्स) या वर्गाच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थीनींना तसेच महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमास सायरस गोलवाला, डॉ. विशाल मुरकुटे, सुनिल जाधव, अमोल राजगुरू, नरेश चव्हाण आदी उपस्थित होते. बाबुसाहेब कांबळे यांनी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक तर शैलेश तुरवणकर यांनी आभार मानले.