जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद चले जाव

0

या लहान मुलांप्रति आपल्या सार्‍या संवेदना मेल्या आहेत का? मोदी जनतेशी मन की बात करतात. मात्र, माणसे, मुले मरतात तेव्हा गप्प का असतात? अशा वेळी सत्ताधार्‍यांच्या संवेदना जातात कुठे? स्वतःच्या नाकर्तेपणाविषयी न बोलता ते भलतेच काही तरी बोलत बसतात. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या जागा, औषधे, साधनसामग्री याविषयी चकार शब्दही काढत नाहीत. सबका साथ सबका विकास बोलत सत्तेवर आलेले हे राज्यकर्ते लोकांच्या प्रश्‍नावर गंभीर कधी होणार? फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात काय चालू आहे. कष्टकरी, दलित, आदिवासीला साधं माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे का?. पिण्याच्या पाण्यापासून स्मशानभूमीपर्यंत त्याला संघर्ष करावा लागतोय, काय आपली मानसिकता आहे? एक गाव एक पाणवठाची चळवळ डॉ. बाबा आढावांनी 70च्या दशकात सुरू केली. गावात दलितांना साधं पिण्याचं पाणीही भरता येत नाही हे वास्तव त्यांनी समोर आणलं. काही काळ पाणवठे सुरू झाले. नंतर काय? आज काय स्थिती आहे? पाणवठ्याबरोबर आता एक गाव एक स्मशानभूमीची मागणी होऊ लागली आहे. त्याचे आपण काय करणार आहोत? कोकणातील कणकवलीजवळील चिंचवली गावात असलेल्या स्मशानभूमी प्रश्‍नावरून ग्रामपंचायत कार्यालयात प्रांताधिकार्‍याच्या समोर सुनावणी सुरू असताना त्यांच्यासमोर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष तानाजी कांबळे, मुंबईहून गेलेले आरपीआय महाराष्ट्राचे सचिव आणि जिल्हा निरीक्षक मधू मोहिते आदी कार्यकर्त्यांना गावातील सवर्ण समाजातील जमावाने लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. गेल्या महिन्यापासून चिंचवली स्मशानभूमी प्रश्‍नावरून गावातील सवर्ण समाज आणि दलित समाजामध्ये वाद आहेत. याबाबत दलित समाजातील लोकांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी कणकवली प्रांताधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी नीता शिंदे यांनी चिंचवली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावली होती. या बैठकीला दोन्ही गटांच्या लोकांना बोलावले होते. त्यावेळी एका गटाचे जबाब सुरू असताना तानाजी कांबळे यांना काही लोकांनी अडवले तुम्ही दुसर्‍या गावातील आहात, तुमचे काय काम असे बोलून वादावादी झाली आणि त्यातून मारहाण झाली. या मारहाणीत जबर जखमी झालेले तानाजी कांबळे सोबत आरपीआयचे महाराष्ट्राचे नेते मधू मोहितेही होते. 1980च्या दरम्यान महाराष्ट्रात विषमता निर्मूलन समिती, छात्र युवा संघर्ष वाहिनी, चळवळीपासून सामाजिक भान आलेले मधू मोहिते नेहमीच सामाजिक, राजकीय चळवळीत अग्रेसर राहिले आहेत. गावकुसाबाहेरच्या लोकांना न्याय मिळेल अशी आंदोलने करीत राहिले. मंडल आयोग, गिरणी कामगारांच्या प्रश्‍नावर त्यांनी लढे दिलेले आहेत. या सर्व लढ्यातून एक सामाजिक ध्रुवीकरण होत होतं. 70 -80 च्या दशकात सामाजिक प्रश्‍नावर अनेक आंदोलने झाली, त्या प्रश्‍नांना टोक आणलं गेलं. सामोपचाराने, अहिंसक मार्गाने आणि संवादाने प्रश्‍न सुटू शकतात, असा विश्‍वास असलेले मोहिते केवळ दलितांचे प्रश्‍न घेऊन काम करीत नाहीत, तर शोषित, कष्टकरी, गरीब माणसाच्या प्रश्नासाठी लढत आहेत आणि अशा माणसावर गावात हल्ला होतो हे जास्त दुःखदायक आहे.

तीन महिने जिल्हा प्रशासनला माहीत असताना त्यांनी हा सामाजिक प्रश्न ज्या बोथट पद्धतीने हाताळला ते अतिशय गंभीर आहे. बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू अशा अभ्यासू, चारित्र्यवान, प्रगल्भ विचारांचा वारसा लाभलेल्या या जिल्ह्यात राजकीय स्वातंत्र्याच्या 71 वर्षांनंतर ही या गावात सामाजिकदृष्ट्या किती मागासलेपणा आहे, हे प्रकर्षाने जाणवते. तानाजी कांबळे आणि मधू मोहिते ज्या ठझखचे काम करतात तो पक्ष राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी आहे. त्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांना सामाजिक प्रश्नावर मार खावा लागतो हे योग्य नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यात लक्ष घातलं असेलच. त्या जमावावर काय कारवाई होते ते थोड्याच दिवसात दिसेलही. सर्वच प्रश्न कायद्याने सुटत नाहीत तर मतपरिवर्तन आणि संवादाने सुटत असतात तोपर्यंत म्हणू या…..
जातीभेद, चलेजाव…
धर्मभेद, चलेजाव…

शरद कदम- 9224576702