या घटनेनंतर जातीयवादी व्यक्ती, संघटना तसेच प्रसिद्धीमाध्यमे यांनी हा विषय उचलून सोवळे-ओवळे, ब्राह्मण समूह, मनुस्मृती, जातीव्यवस्था वगैरे मांडणी करून हा निर्मला बाईंवर अपमान झाल्याचा टाहो फोडत डॉ. खोले यांच्या झालेल्या फसवणुकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
सोवळे आणि जात यांचा संबंध नाही!
शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी खोले यांच्याविरोधात निदर्शने करून तापलेल्या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. या दबावामुळे खोले यांनी निर्मला यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली, तर निर्मला यांच्या नातेवाइकांनी सध्या तरी त्यांनी डॉ. खोले यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. एकंदरीत या प्रकारातून मूळ विषयाला बगल देत जातीय मांडणी करून ब्राह्मण समूह अन् कर्मकांडातील बंधने यांवर तोंडसुख घेणार्या जातीयवाद्यांचे वैचारिक ओवळे दिसून आले.
या प्रकरणाच्या निमित्ताने सोवळे आणि ब्राह्मण जात यांचा संबंध जोडून जातीयवाद्यांनी टीका केली; पण प्रत्यक्षात सोवळे ही संकल्पना केवळ ब्राह्मण जातीशी निगडित नाही. यामागे उच्च-नीचपणाची भावना आणि अंधश्रद्धा तर त्याहून नाही. सोवळे ही केवळ प्रथा नसून परिपूर्ण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक संकल्पना आहे. सोवळे हा प्रकार सर्व प्रकारच्या जातींमध्ये दिसून येतो. रत्नागिरी, कोल्हापूर तसेच अन्य अनेक ठिकाणी देवळांमधील ब्राह्मणेतर पुजारीही सोवळे पाळतात. सोवळे म्हणजे स्वच्छ धुतलेले (धूतवस्त्र) रेशमी वस्त्र! अशा वस्त्रांमध्ये सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे सोवळे परिधान केल्याने व्यक्तीभोवती कवच निर्माण होऊन देवतेचे तत्त्व ग्रहण करणे सोपे असते. प्रकाश परिवर्तीत होतो म्हणून उन्हाळ्यामध्ये पांढरे कपडे वापरावेत, असे सांगितले जाते. त्याचप्रमाणे स्वतःमधील सात्त्विकता वाढवण्यासाठी सोवळे परिधान करावे. सोवळ्यातील स्वयंपाक केला, तर अन्नाची शुद्धताही राखली जाते, इतका सूक्ष्म विचार करून स्वयंपाक करताना कशा प्रकारचे कपडे परिधान करावेत, याची परिपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितली असल्याविषयी खरेतर अभिमान बाळगायला हवा. पण कथित बुद्धिवाद्यांनी जातीयतेचा चष्मा लावल्याने धार्मिक प्रथा-परंपरा यांमागील शास्त्र बुद्धिवाद्यांना दिसत नाही.
साधना मार्ग महत्त्वाचा!
ईश्वरप्राप्ती अथवा मोक्षप्राप्ती हे मानवी जीवनाचे ध्येय असावेे, असे धर्मग्रंथातून सांगितले आहे. ते ध्येय प्राप्त करण्याचे हठयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग आदी साधना मार्ग आहेत. प्रत्येक मार्गाचे निराळे नियम आहेत. भक्तीयोगानुसार ईश्वराची तल्लीन होऊन भक्ती करणार्याला देहाचे बंधन राहत नाही. भक्ती करण्यासाठीही वेळेचेही बंधन नाही. स्थळ आणि काळ यांच्या निरपेक्ष साधना करणे भक्तीमार्गात शक्य आहे. ही गोष्ट कर्मयोगाला लागू होत नाही. एखादा धार्मिक विधी करताना तो दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केला, तर त्या विधीचे मिळणारे फळ अधिक असते. कर्मकांडातील उपासनेप्रमाणे नैवेद्याचा स्वयंपाक करताना काही पथ्ये सांभाळून तो केला जातो. सोवळ्यातील स्वयंपाकासाठी केवळ स्थूलदेहाची शुद्धी नाही, तर मानसशुद्धी आणि आत्मशुद्धीही अपेक्षित असते.
धर्म काय सांगतो, ते जाणून घ्यावे
वकिलांच्या काळ्या कोटवर, शल्यचिकित्सागृहातील डॉक्टरांच्या विशिष्ट पेहेरावावर, तेथील उपकरणांची शुद्धी होण्यावर कुणी आक्षेप घेत नाही, मग केवळ सोवळ्यातील स्वयंपाकालाच आक्षेप का? यातूनच बुद्धिवादी म्हणवणार्यांची शास्त्र जाणून घेण्याची जिज्ञासा नसून त्यांना केवळ जातीय रंग देऊन धार्मिक प्रथा, हिंदू धर्म यांवर टीका करायची असल्याचे स्पष्ट होते. तसे नसते, तर निर्मला यांच्या अपमानापेक्षा खोले यांच्या झालेल्या फसवणुकीकडे लक्ष दिले गेले असते. जात लपवल्याने नगरसेवक अथवा तत्सम पद सोडावे लागल्याची बातमी चार ओळींची आणि डॉ. खोले यांची बातमी 4 दिवसांची असा भेद राहिला नसता. तात्पर्य, जातीयवाद्यांच्या वैचारिक ओवळ्याच्या जाळ्यात न अडकता नागरिकांनी धर्मशास्त्र जाणून घेऊन तसेच तार्किक विचार करून प्रत्येक गोष्टीतील तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण दिसतं तसं असतंच, असं नाही.
-चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387