जातीवाचक शिवीगाळ; अ‍ॅट्रॉसिटी दाखल

0

चाळीसगाव । तालुक्यातील नांद्रा (पिरवाडी) येथे बकरी चारत असतांना मोटार सायकलची धडक देत जातीवाचक शिवीगाळ करत कुर्‍हाडीने मारहाण केल्याची घटना रविवारी 30 रोजी घडली. जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या दोघांवर मेहुणबारे पोलीस स्टेशनला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहुणबारे पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नवनाथ शिवाजी गांगुर्डे (19) यांनी पिरवाडी नाल्याजवळ बकर्‍या चारत असतांना चेतन रविंद्र पाटील याने मागुन मोटार सायकलने येत बकरीला धडक मारली. धडक मारल्याचे विचारत मोटार सायकल हळु चालव असे म्हटल्याचा राग येवुन त्याने मारहाण करत बकर्‍या पिरवाडी येथे नेत किरण शिवराम पाटील, चेतन रविंद्र पाटील, बबलू भास्कर पाटील, रविंद्र शिवराम पाटील यांनी मोबाईलवर फोन करुन आई व भाऊ यांना बोलावून घेत मारहाण केली. चेतन व बबलु यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तर किरणने सोन्याची पोत तोडुन नुकसान करुन तिघांना मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. अ‍ॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधिक्षक अरविंद पाटील करीत आहेत.

दुसर्‍या फिर्यादीत चेतन रविंद्र पाटील यांनी शेतातील सालदाराला पैसे देण्यासाठी गेले असता शेताच्या बांधावर नवनाथ शिवाजी गांगुर्डे, मच्छिंद्र शिवाजी गांगुर्डे हे बकर्‍या चारत असतांना पिकाचे बकर्‍या नुकसान करीत असल्याने शेतातुन बकर्‍या काढुन घ्या असे सांगितले. याचा राग नवनाथ गांगुर्डे यास आल्याने त्यांनी आम्ही तुझ्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करुन तुला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली असल्याचे सांगितले आहे. दोघांनी मारहाण केली व नवनाथने कुर्‍हाड त्यांच्या हाताच्या मनगटावर मारुन दुखापत केली व खिसा फाटल्याने दोघांपैकी एकाने खिशातील एक हजार रुपये काढुन घेतल्याचे म्हटले आहे या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास साहाय्यक फौजदार छबुलाल नागरे करीत आहेत.