जातेगाव खुर्दमध्ये निघाले चक्क सव्वातीन किलो वजनाचे रताळे

0

शिक्रापूर । जातेगाव खुर्द (ता. शिरूर) येथील माजी सरपंच मच्छिंद्र मासळकर यांनी त्यांच्या घराजवळील एक गुंठा जागेमध्ये रताळ्याचे वेल लावले होते त्याची कोणतेही औषध न फवारता योग्य देखभाल केली असून त्या जागेमध्ये चक्क सव्वा तीन किलो वजनाचे रताळे निघाले आहे.

मासळकर यांनी त्यांच्या घराशेजारील शेताच्या जागेमध्ये अडीच महिन्यांपूर्वी एक गुंठा जागेमध्ये घरी वापरण्यासाठी रताळ्याचे वेल लावले होते, त्या पिकाचे त्यांनी कोणतेही औषध न फवारता देखभाल केली व वेळेमध्ये पाणी दिले, आज सकाळी त्याचे मित्र प्रवीण कौटकर, शिवाजी घोलप व संजय ढमढेरे हे सहज घराशेजारील शेतातून रताळे काढत असताना त्यांना त्यामध्ये चक्क मोठमोठे रताळे दिसून आले. भलेमोठे रताळे पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. यावेळी त्यांनी रताळे काढून वजन केले असता तीन किलो दोनशे ग्रॅम वजनाचे रताळे असल्याचे निदर्शनास आले.

योग्य निगा राखल्यास चांगले पिक
त्यांनतर अनेकांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी देखील केली. शेतीमध्ये कोणतेही पिक घेतल्यास त्याची योग्य निगा राखल्यास कोणत्याही औषध व खताविना देखील चांगले पिक घेता येते हे मासळकर यांनी दाखवून दिले आहे. तसेच अनेक जण त्यांच्या शेतामध्ये लावण्यासाठी मासळकर यांच्याकडे रताळ्याचे वेल मागत असल्याचे मासळकर यांनी सांगितले.