मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक महंमद अफजल यांचे मत
पिंपरी : देशाच्या कानाकोपर्यात राहणारे मुसलमान बांधव हे विदेशातील नाहीत. ते याच देशाचे नागरिक आहेत. या देशात वेगवेगळ्या जाती-धर्माचे नागरिक राहतात. परंतु, आपल्या देशाची संस्कृती एकच आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचा जात आणि धर्म वेगवेगळा असला, तरी आपल्या सर्व जाती-धर्मांची संस्कृती एकच आहे. त्यामुळे देशातील मुस्लिम बांधवांनी सर्वांसोबत मिळून मिसळून राहावे, असे आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक महंमद अफजल यांनी केले. पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम राष्ट्रीय मंच आणि जिजाई प्रतिष्ठान यांच्यावतीने शहरातील मुस्लिम बांधवांसाठी कासारवाडी येथे आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते.
यावेळी मंचाचे सहसंयोजक इरफान पिरजादे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, भाजपचे ज्येष्ठनेते आझम पानसरे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, हिराबाई घुले, अनुराधा गोरखे, चंदा लोखंडे, शर्मिला बाबर, नगरसेवक हर्षल ढोरे, नामदेव ढाके, शीतल शिंदे, केशव घोळवे, सागर आंगोळकर, कुंदन गायकवाड, राजेंद्र गावडे, भाजपच्या प्रदेश सदस्य उमा खापरे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक, माजी नगरसेवक विनायक गायकवाड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, भाजपचे शहरसरचिटणीस सारंग कामतेकर, प्रमोद निसळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, संजय शेंडगे, अजिज शेख, नसीर शेख, सादिक शेख आदी उपस्थित होते.
दगडफेक ही पाकिस्तान पुरस्कृत
उपस्थित मुस्लीम बांधवांना मार्गदर्शन करताना महंमद अफजल म्हणाले की, मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे केंद्र सरकारने या पवित्र महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये जवानांकडून गोळीबार न करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. परंतु, शत्रूराष्ट्र पाकिस्तानला या पवित्र महिन्याचा अर्थ कळला नाही. सीमेपलीकडून गोळीबार सुरूच ठेवला. नोटाबंदीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये थोडी शांतता नांदू लागले आहे. नोटाबंदीनंतर याठिकाणी जवानांवर होणारे दगडफेकीचे प्रकार बंद झाले आहेत. जवानांवर होणारी दगडफेक ही पाकिस्तान पुरस्कृत होती. दगडफेक करणार्यांना दिवसाला 500 रुपये दिले जात होते. नोटाबंदीनंतर पैसे मिळणे बंद झाल्यामुळे दगडफेकीचे प्रकारही बंद झाले आहेत.
सर्वांची संस्कृती एकच
देशात राहणार्या प्रत्येकाची जात आणि धर्म वेगवेगळा आहे. परंतु आपण सर्वजण एकाच संस्कृतीचे पाईक आहोत. एकाच प्रकारच्या वातावरणात राहणारे आहोत. हिंदू असो की मुसलमान सर्वांची संस्कृती एकच असल्यामुळे आपण सर्वजण गुण्यागोविंदाने राहत आहोत. या देशातील मुस्लिमही याच संस्कृतीचाएक भाग आहेत. ते याच देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे आपण सर्वांसोबत मिळून मिसळून राहू, असे आवाहनही महंमद अफजल यांनी केले.
असे उपक्रम राबवावेत
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच आमदार महेश लांडगे यांनी मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या. हिंदु-मुस्लीम बांधवांनी एकोप्याने रहावे. समाजात सुख, समाधान आणि शांतता नांदावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. समाजात एकोपा अबाधित राहावा यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत जिजाई प्रतिष्ठानच्या संस्थापिका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी व्यक्त केले.