पत्रकार परिषदेत शिवसेनेचा आरोप
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत चिखली येथून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजप नगरसेवकाचा जातपडताळणी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज बुलढाणा जात पडताळणी समितीने अवैध ठरविला आहे. त्यावर महापालिकेने तातडीने कारवाई करणे गरजेचे असताना केवळ सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे महापालिका प्रशासन वेळकाढूपणा करत आहे. तसेच या प्रकरणात दावा दाखल केलेल्या शिवसेना उमेदवारावर दबाव आणला जात असून त्याची बदनामी केली जात आहे. त्यामुळे भाजपशी संगनमत करणार्या महापालिका आयुक्तांची चौकशी करून करून योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहर संघटक सुलभा उबाळे, अभिमन्यू लांडगे, नितीन रोकडे, अॅड. सुनील माने, अॅड. एस. जे. वाळके आदी उपस्थित होते.
खोटा दाखला सादर
योगेश बाबर म्हणाले की, महापालिका निवडणुकीत चिखली (प्रभाग क्रमांक 1) येथून अनुसूचित जाती या राखीव प्रवगातून कुंदन गायकवाड हे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे नितीन रोकडे यांनी निवडणूक लढविली होती. कुंदन गायकवाड यांनी खोटा जातीचा दाखला सादर केल्याप्रकरणी नितीन रोकडे यांनी बुलढाणा उपविभागिय अधिकार्यांकडे दावा दाखल केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला. गायकवाड हे भाजपचे नगरसेवक असल्याने महापालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही.
निःपक्षपाती चौकशीची गरज
जातपडताळणी समितीचा आदेश आल्यावर महापालिकेचे सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर हे रजेवर गेले. तर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निःपक्षपातीपणे चौकशी करणे गरजेचे असताना ते कारवाई करण्यास सोयीस्करपणे टाळाटाळ करत आहेत. सत्ताधारी भाजपची महापालिका अधिकारी मिलीभगत करत आहेत. त्यातूनच या प्रकरणात जाणीवपूर्वक विलंब लावला जात आहे, असा आरोप सुलभा उबाळे यांनी केला.