जात पडताळणी कार्यालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

0

नंदुरबार । येथील जातपडताळणी कार्यालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे, जात प्रमाणपत्र साठी दूर दूर हुन विद्यार्थी आणि पालक या कार्यलयात चकरा मारत आहेत परंतु त्यांना विविध कारणांमुळे प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी वर्गाचा प्रवेश रद्द होण्याची भीती व्यक्त केली जात आहे,अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दि.3 जुलैपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचा विविध अभ्यासक्रमातील प्रवेश हा रद्द होण्याची शक्यता आहे. या भितीपोटी विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह पालकांनी नंदुरबार येथे आदिवासी विकास विभागाचे जात पडताळणी कार्यालयाकडे धाव घेतली आहे.

विद्यार्थी-पालकांची होतेय गर्दी
नंदुरबार, धुळे, जळगाव, अमळनेर, पालघर अशा अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांचे जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल आहेत. दोन दिवसांपासून कागदपत्रांची त्रुटींची पूर्तता करण्यासाठी नंदुरबार येथे काल दि.19 रोजी नंदुरबार येथील जात पडताळणी कार्यालयाच्या बाहेर सुमारे 300 ते 400 हून अधिक विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली. मात्र संबंधित विभागाने कार्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्वाराला कुलूप लावून आत प्रवेश देण्यासाठी बंदी केली. त्यातच अधिकार्यांच्या मनमानीमुळे सकाळी दहा वाजेपासून आलेल्या विद्यार्थ्यांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागले आहे. काही विद्यार्थी दोन ते तीन दिवसांपासून नंदुरबारात मुक्कामी आहेत. परंतू कागदपत्रे देण्यासाठी अधिकार्यांच्या कामाची गति मंदावली आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वेळ व पैशाचाही वाया जात आहे. सर्व सामान्य विद्यार्थी हैराण झाला आहे. त्यातच अधिकारी वेगवेगळ्या कागदांची कधीही मागणी करतात, त्यामुळे छायांकित प्रति काढण्यासाठी विद्यार्थ्यांनाह शहरात यावे लागते. एकाचवेळी त्रुट्या सांगितल्या तर विद्यार्थ्यांना सोपे जाणार आहे. परंतू संबंधित अधिकारी मनमानी पध्दतीने वाटेल तेव्हा कागदपत्रांची मागणी करतात आहेत. साहजीकच जात पडताळणीचे प्रमाणपत्र देण्यास विलंब होत आहे. यात काल मंगळवारी कार्यालयाने मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी झाली.नंदुरबार येथील जात पडताळणी समितीचे कार्यालय या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत राहते, कर्मचार्‍यांच्या भोंगळ कारभारामुळे शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.