यावल- जात प्रमाणअभावी यावल पंचायत समितीती भाजपच्या सदस्या लताबाई भगवान कोळी यांना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अपात्र ठरवले आहे. यापूर्वी पंचायत समिती सभापती निवडीवेळी व्हीप झुगारल्याने दहिगाव गणातील संध्या महाजन यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली होती तर आता कोळी अपात्र ठरल्याने पंचायत समितीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी निकालाची प्रत प्राप्त
लताबाई कोळी यांनी सांगवी-भालोद गणातून अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर विजय मिळवला मात्र वेळेच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने काँग्रेसचे गटनेते शेखर पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे 30 ऑगस्ट 2018 रोजी कोळी यांच्या अपात्रतेसाठी तक्रार केली होती. राज्य निवडणूक आयोगाने 7 सप्टेंबर 2018 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आरक्षित जागेवरील उमेदवारांना सहा महिन्यांऐवजी 12 महिने मुदतवाढ करून दिल्यानंतरही कोळी यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना जिल्हाधिकार्यांनी अपात्र घोषित केले.