भुसावळ । शासनाने तीनचाकी व चारचाकी रिक्षा, मिनीडोअर, कालीपिली आणि इतर वाहनांवर जास्तीचा कर लावल्यामुळे वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने या निषेधार्थ राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे शनिवार 21 रोजी प्रांत कार्यालयावर चेतावनी मोर्चा काढण्यात येवून एकदिवसीय बंद पाळण्यात येणार आहे. प्रवासी वाहनधारकांवर जास्तीच्या करामुळे आर्थिक बोजे वाढले आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत असून शासनाने जादाचा कर रद्द करावा तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी मनमानी करीत असून जागेवर मेमो न देता वाहन बळजबरीने बस डेपो येथे लावतात आणि महिनाभर वाहन सोडत नाही. यातून पैशांची बेकायदेशिर मागणी केली जाते. याबद्दल संबंधित आरटीओ कर्मचार्यास बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या निषेधार्थ प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येवून प्रवासी वाहतूक एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या आंदोेलनात भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड व जामनेर येथील वाहनधारक सहभागी होतील. तरी जास्तीत जास्त संख्येने वाहनधारकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांनी केले आहे.