जाधव यांच्या सुटकेसाठी सर्व प्रयत्न करणार

0

नवी दिल्ली : भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पाकिस्तानात झालेल्या फाशीच्या शिक्षेतून वाचविण्यासाठी भारत सरकार सर्व प्रयत्न करेल. पाकिस्तानने परिणाम भोगण्यासाठी तयार रहावे, असा इशारा भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत बोलताना दिला. संसदेच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी कुलभूषण जाधव प्रकरणाचा निषेध करण्यात आला. हा भारताविरूध्दचा कट आहे, असेही स्पष्ट करण्यात आले. केंद्र सरकारतर्फे राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सभागृहाला अश्‍वासन दिले की, महिंदुस्तान के बेटेफ कुलभूषण जाधव यांना वाचविण्यासाठी भारत मआऊट ऑफ द वेफ जाण्यासही मागे-पुढे पाहणार नाही.

मी जाधव कुटूंबाच्या संपर्कात
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलम नबी आझाद म्हणाले, भारताला कमीपणा आणण्यासाठी पाकिस्तानने जाधव यांना खोट्या आरोपाखाली अडकवले आहे. सरकारने जाधव यांना वाचविण्यासाठी वकील उपलब्ध करून दिला पाहिजे. यावर सुषमा स्वराज म्हणाल्या, जाधव यांना कायदेशीर मदत देणे ही खुप छोटी गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टासाठी सुध्दा मोठ्यात मोठा वकील उपलब्ध करून दिला जाईल. एवढेच नव्हे, या सर्व प्रकरणात जाधव यांना वाचविण्यासाठी जे काही करता येईल ते करू. कुठलाही मार्ग अवलंबावा लागला तरी चालेल. ज्या दिवशी जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पकडण्यात आले तेव्हापासून मी त्यांच्या कुटूंबियांच्या संपर्कात आहे. त्यांच्या आई-वडिलांशी बोलत आहे, असे स्वराज म्हणाल्या. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पाकिस्तानने कायदा गुंडाळून ठेवत जाधव यांना फाशी सुनावली आहे. जाधव यांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न भारत करणार आहे. जाधव यांच्याकडे भारताचा अधिकृत पासपोर्ट होता. परंतु पाकने त्यांचे इराणमधून अपहरण केले.

काँग्रेसने आवाज उठवला
काँग्रेसने कुलभूषण जाधव प्रकरणावर स्थगन प्रस्ताव दाखल केला होता. संसदेचे कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा विषय मांडताना सांगितले की, जर जाधव यांना वाचविण्यात यश आले नाही तर हा भारत सरकारचा कमजोरपणा ठरेल. जर जाधव यांना फाशी झाली तर त्यास हत्याच समजण्यात यावे. जाधव प्रकरणात पाकने आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन केलेले नाही. त्यांना वकील सुध्दा दिला गेला नाही. भारताने यावर योग्य प्रत्युत्तर देऊन आपली ताकद दाखवली पाहिजे. खरगे यांनी मोदी यांच्या नवाज शरिफ भेटीबाबत बोलताच सभागृहात गोंधळ झाला. परंतु केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी या प्रकरणावर कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन केले व जाधव यांच्याबरोबर संपुर्ण भारत आहे, असे सांगितले. एमआएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी सभागृहात म्हणाले की, सरकारला या प्रकरणी गंभीरपणे विचार करावा लागेल. जाधव यांना वाचविण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना फसवूण पाकिस्तानने पकडले आहे. सरकारने याप्रकरणात ठोस पावले उचलावीत.

ही सुनियोजित हत्या
कुलभूषण जाधव यांना पाकने सुनावलेली फाशी म्हणजे सुनियोजित हत्या आहे. पाककडे जाधव यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही. जर जाधव यांना फाशी देण्यात आली तर पाकिस्तानने परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. दोन्ही देशांच्या संबंधांवर याचा परिणाम होईल.
-सुषमा स्वराज