शेवटच्या तासात भाजपकडून अधिकृत 5 वा उमेदवार घोषित
राष्ट्रवादी बंडखोराला पुन्हा विधानपरिषदेची संधी
निलेश झालटे नागपूर : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी बिनविरोध निवडणुकीचे संकेत असतानाच रासप नेते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भाजपच्या एकाधिकारशाहीला शह दिल्याने या निवडणुकीत रंगत आली आहे. विधानपरिषदेच्या 11 पैकी पाच जागांचे उमेदवार भाजपने जाहिर केले मात्र जानकर यांनी भाजपची उमेदवारी नाकारत रासप मधूनच अर्ज भरण्याचा हट्ट पूर्ण केला. मुख्यमंत्र्यासह पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतरही जानकर यांनी भाजपची उमेदवारी नाकारल्याने अखेरच्या तासात सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची भाजपने उमेदवारी दाखल केली. मात्र यावेळी जानकर यांच्या उमेदवारीचेही समर्थन करत सहयोगी पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांना मान्यता दिल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.
काल, बुधवारी दिल्लीहून भाजपच्या 5 उमेदवारांची यादी आली होती. त्यात जानकर यांच्या नावाचाही समावेश होता. तेंव्हा ही निवडणूक बिनविरोध होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. मात्र जानकर भाजपची उमेदवारी घेत नाहीत असा निरोप अमित शहा यांना दिल्यानंतर त्यांनीही ‘समझोता’ करू नका. पक्षाचा उमेदवार द्या, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने निवडणुकीची समीकरणे पालटण्याचे संकेत मिळाले आहेत. आज, गुरुवारी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. ऐनवेळी पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपचा पाचवा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरल्याने चुरस निर्माण झाली आहे.
भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे सहयोगी आमदार व मंत्री महादेव जानकर यांच्यासह भाई गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील, पृथ्वीराज देशमुख आणि निलय नाईक यांना उमेदवारी घोषित केली आहे. यामुळे निलय नाईक व पृथ्वीराज देशमुख या दोन्ही राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराली विधानपरिषेत भाजपने पुन्हा संधी दिली आहे. या सर्वांनी अर्ज भरले असून शिवसेनेचे उमेदवार अॅड. अनिल परब आणि मनिषा कायंदे यांच्यासह, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. 11 जागांसाठी 12 अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे अद्याप नाहीत. उद्या 6 जुलैला अर्जांची छाननी करण्यात येईल. 9 जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे या दिवशी एका उमेदवाराने उमेदवारी मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होईल अन्यथा 16 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येवून त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल.