जानकर गोत्यात, धमकी महागात पडणार!

0

नागपूर : (विशेष प्रतिनिधी) –राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणखी गोत्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकार्‍याला धमकावल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, या आदेशाला स्थगिती मिळविण्यासाठी जानकरांनी न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार देत, न्यायालयाने याचिका फेटाळल्याने जानकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.

काय होते प्रकरण..
मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे जानकर यांना आपली याचिका मागे घ्यावी लागली. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी दुसर्‍या टप्प्यातील निवडणुकीदरम्यान जानकरांनी त्यांच्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह देण्याची मागणी संबंधित अधिकार्‍याकडे केली होती. शिवाय, काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्याची सूचनाही त्यांनी या अधिकार्‍याला केली होती.

मुख्यमंत्र्यांनी केली होती पाठराखण
मंत्री जानकर यांच्या धमकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेत, जानकरांविरोधात तक्रार दाखल केली होती. आयोगाने या धमकीचा व्हिडिओ पाहून, जानकरांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्‍न उपस्थित केला होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांची पाठराखण केली होती.