जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विवेकानंद जन्मोत्सवाची धूम

0

हिवरा आश्रम येथे पहिल्यांदाच विवेकानंद विचार साहित्य संमेलन

हिवरा आश्रम : मानवहितकारी संत पूज्यनीय शुकदास महाराज यांनी सुरु केलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे 53वे वर्ष असून, यावर्षीचा जन्मोत्सव सोहळा हा महाराजश्रींच्या पश्च्यात पहिल्यांदाच साजरा होत आहे. दिनांक 6 ते 8 जानेवारी 2018 दरम्यान हा सोहळा पार पडत असून, जन्मोत्सवासाठी विवेकानंद आश्रमाच्यावतीने जय्यत तयारी सुरु झाली आहे. यावर्षी आयोजित विवेकानंद विचार साहित्य संमेलन हे सोहळ्याचे खास आकर्षण आहे. जगभरातील विवेकानंद विचारप्रेमी साहित्यिकांची या संमेलनास हजेरी लाभेल. 6 जानेवारीला सकाळी नऊ ते साडेदहा वाजेच्यादरम्यान रामकृष्ण मठ, पुणेचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंदजी यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन नियोजित असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. हिवरा आश्रम परिसरात गारठा वाढला असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परिसरातील तापमान सरासरी 12 ते 16 अंश सेल्सिअसच्यादरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने गुलाबी थंडीत येथील ज्ञानयज्ञ पेटणार आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना संतोष गोरे यांनी सांगितले, की 6 जानेवारी 2018 पासून 53वा विवेकानंद जन्मोत्सव सोहळा सुरु होत असून, पहिल्या दिवशी सकाळी 7 ते 9 प्रार्थना, भक्तीगीत गायनाने या सोहळ्यास सुरुवात होत आहे. सकाळी नऊ वाजता रामकृष्ण मठ, पुणेचे अध्यक्ष स्वामी श्रीकांतानंदजी यांच्याहस्ते विवेकानंद विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. यंदा प्रथमच स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे साहित्य संमेलन भरविले जात आहे. उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात सकाळी साडेदहा वाजता युगाचार्य स्वामी विवेकानंदांची विचारधारा या विषयावर सांगली येथील व्याख्यात्या डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांचे व्याख्यान, दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप. कान्होबा महाराज, देहू यांचे कीर्तन, दुपारी दोन ते पाच वाजेदरम्यान पूज्यनीय शुकदास महाराजश्रींच्या प्रतिमेची सवाद्य शोभायात्रा निघणार आहे.

जळगाव येथील व्याख्याते यजुवेंद्र महाजन यांचे सायंकाळी पाच वाजता व्याख्यान होणार असून, सहा वाजता स्वामी श्रीकांतानंदजी यांच्या व्याख्यानाचा लाभ भाविकांना घेता येईल. ते विवेकानंद विचारप्रेमींना स्वामी विवेकानंदांचे कार्य व विचार याबाबत प्रबोधित करतील. रात्री 8 वाजता हिमालयतपस्वी हभप अशोक महाराज कवर यांचे कीर्तन पार पडेल. दि.7 जानेवारीरोजी सकाळी 8 वाजता वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप. प्रकाशबुवा जवंजाळ यांचे कीर्तन, सकाळी साडेनऊ वाजता प्राचार्य डॉ. राम देशमुख (जळगाव) यांचे व्याख्यान, 11 वाजता हभप पांडुरंग महाराज गिरी (नाशिक) यांचे कीर्तन, दुपारी 1 वाजता वणी येथील व्याख्याते प्रा. स्वानंद पुंड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. दुपारच्या सत्रात अडिच वाजता आळंदी देवाची येथील हभप. रमेश महाराज वाघ यांचे कीर्तन, साडेचार वाजता वीटा येथील व्याख्याते अभय भंडारी यांचे व्याख्यान, सायंकाळी पाच वाजता सोलापूर येथील विवेक विचारचे संपादक सिद्धाराम पाटील यांचे व्याख्यान, रात्री सात वाजता आळंदी देवाची येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप. संदीपान महाराज शिंदे यांचे कीर्तन पार पडेल. रात्री नऊ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार हभप. डॉ. उद्धव महाराज गाडेकर यांच्या राष्ट्रीय कीर्तनाने दुसर्‍या दिवसाच्या सत्रांची सांगता होईल.

शेवटच्या दिवशी दि. 8 जानेवारीरोजी सकाळी नऊ वाजता वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांचे प्रवचन पार पडणार असून, ते आपल्या प्रवचनातून विवेकानंदांच्या साहित्य विचारांचा वेध घेणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूर येथील दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक श्रीराम पचिंद्रे यांचे विवेकानंदांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान पार पडणार असून, दुपारच्या सत्रात पंढरपूर येथील प्रज्ञाचक्षू हभप. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे कीर्तन पार पडेल. दुपारी 2 ते 5 दरवर्षीप्रमाणे सुमारे तीन लाख भाविकांना पुरी-भाजीचा महाप्रसाद वितरित केला जाईल. सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य यशवंत पाटणे (सातारा) यांचे विवेकानंदांच्या साहित्य आणि अनुबोधांवर व्याख्यान पार पडणार असून, त्यांच्या या व्याख्यानाने विवेकानंद विचार साहित्य संमेलनाची सांगता होईल. विवेकानंद विचार साहित्य संमेलनातून झालेल्या वैचारिक मंथनाचे विश्लेषणही डॉ. पाटणी आपल्या व्याख्यानात करतील. सात वाजता विनोदमूर्ती हभप. केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन तर शेवटच्या सत्रात रात्री नऊ वाजता सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहितीही सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शुकदास महाराजश्रींची उणिव भासणार!
1965च्या दशकात हिवरा बुद्रूकसारख्या एका छोट्याशा खेड्यात युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर विभूतीच्या नावाने विवेकानंद जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याची परंपरा निर्माण करणारे मानवहितकारी संत पूज्यनीय शुकदास महाराज यांची उणिव यावर्षी भासणार आहे. दरवर्षी महाप्रसाद वितरण सोहळा व शेवटच्या दिवशीचे आशीर्वचन यातील त्यांचा सहभाग हा लाखो भाविकांना प्रभावित करत होता. त्यांच्या आशीर्वचनातून भाविकांना वर्षभरासाठीची ज्ञानाची शिदोरी मिळत होती. यंदा प्रथमच महाराजश्रींविना हा सोहळा पार पडणार आहे. जन्मोत्सव सोहळ्याच्या तयारीची जोरदार लगबग विवेकानंद आश्रमात दिसून येत आहे. यंदा दरवर्षीपेक्षा जास्त भाविक या सोहळ्यासाठी येतील, असा अंदाज गृहीत धरून सुमारे साडेतीन ते चार लाख भाविकांच्या सोयीसुविधेची व महाप्रसादाची तयारी सुरु होती.