जळगाव । ‘स्वाइन फ्लू’बाबत सध्या सगळीकडे धोक्याची घंटा वाजवली आहे. 2009 मध्ये स्वाइन नावाच्या वादळाने प्रवेश केला होता. हे वादळ अद्यापही शमले नसल्याचे दिसून येते. संपुर्ण राज्यभरात या रोगाने थैमान घातला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात वातावरणातील थंडी वाढते. परिणामी या महिन्यात या रोगाची साथ अधिक असते. दरम्यान जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट 2017 या आठ महिन्याच्या कालवधीत आठ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. राज्यभरातील स्थिती लक्षात घेता जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला खडबडून जाग आली असून जिल्ह्याभरात स्वाईन फ्लू रोगा विषयी सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच संशयीत रुग्ण आढळल्यास खबरदारीचा उपाय केला जात आहे.
जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा आरोग्य केंद्रात प्रतिबंधात्मक गोळ्यांचा साठा ठेवण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे 10-20 तर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाचशे ते साडेपाचशे गोळ्यांचा साठा ठेवण्यात आला आहे. तर मधुमेह, उच्चरक्तदाब, गरोदर माता यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्यास त्यांच्यासाठी विशेष लस उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अशी माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.
मुंबई प्रयोग शाळेत होते तपासणी
स्वाईन फ्लू आहे किंवा नाही यांची तपासणी करण्यासाठी घशातील, नाकातील स्रावाचे (स्पुटम) नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. जळगाव येथे प्रयोगशाळा नसल्याने हे नमुने मुंबई येथे तपासणीसाठी पाठविले जातात. तपासणीचा अहवाल 24 तासानंतर मिळतो. स्वाईन फ्लूचे लक्षण आढळल्यास तात्काळ रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
जानेवारी ते ऑगस्ट या काळात लागण झालेल्या 8 रुग्णांपैकी तीन रुग्ण दगावले आहे. यात अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील प्रमिला मालजी पाटील, पारोळा येथील प्रणिता सुभाष बोरसे, मेहरुण जळगाव येथील तब्बसूम जहान मोहम्मद हनिफ खान यांचा समावेश आहे. सुदैवाने पाच जणांचा प्राण या रोगातुन वाचले आहे, यात जळगाव येथील घनश्याम रामदास पाटील, भुसावळ येथील सुषान बर्डस्ट्रगन, दिपा खुशलानी, मुक्ताईनगर येथील किसन नामदेव पाटील यांचा समावेश आहे.