जाने वह कौन सा देस, जहाँ तुम चले गए!

0

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात मोदी बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहेत. लाचार, हताश काशीवासीयांकडून हे पोस्टर लावण्यात आल्याचे पोस्टरवर नमूद आहे. हे पोस्टर कुणी लावले याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. खुद्द पंतप्रधानांच्या मतदारसंघात असा प्रकार घडल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांचेही धाबे दणाणले आहे. काही दिवसांपूर्वी अमेठीत राहुल गांधी बेपत्ता अशा आशयाचे पोस्टर्स लागले होते.

मत मागताना शेवटचे पाहिले!
वाराणसीत सर्वत्र लागलेल्या या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असून, जाने वह कौन सा देस जहाँ तुम चले गए, असे लिहिलेले आहे. वाराणसीत यांना मत मागताना शेवटचे पाहिले होते. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्यामुळे नाईलाजाने गुन्हा दाखल करावा लागत आहे, असेही या पोस्टरवर लिहिले आहे. या पोस्टरमुळे स्थानिक प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, विविध केंद्रीय मंत्री सातत्याने वाराणसी मतदारसंघाबाबत बोलताना दिसतात. त्याचदरम्यान अशा प्रकारचे पोस्टर वाराणसीत सर्वत्र झळकू लागल्याने भाजप नेते हादरले आहेत.

राहुल गांधी, केजरीवालांनंतर मोदी
यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातही त्यांच्याबद्दल असेच पोस्टर्स लावण्यात आले होते. त्यावेळीही मोठा गदारोळ झाला होता. केजरीवाल, राहुल गांधींचे पोस्टर्स लागल्यानंतर आनंद घेणारे भाजप नेते आता मात्र मोदी बेपत्ता असल्याचे पोस्टर्स झळकल्याने हादरले असून, यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.