जामठीकरांनी दाखवला कोरोनामुक्तीचा मार्ग : गावबंदीसाठी घातले निर्बंध

0

जिल्ह्यात प्रथमच आदर्श पायंडा : गावाच्या सीमेवर ग्रामपंचायत कर्मचारी तैनात

बोदवड (रवींद्र मराठे) : संपूर्ण जगात धुमाकूळ घाळणार्‍या कोरोनामुळे नागरीक भयभीत असतानाच रोगाचा फैलाव रोखण्यासाठी संचारबंदीसह लॉकडाऊनचे आदेश शासनाने दिले आहेत मात्र त्यानंतरही नाहक नागरीक रस्त्यांवर उतरत असल्याने रोगाचा फैलाव अधिक फैलण्याची भीती आहे. त्यातच बाहेर गावावरून येणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याने व त्यांच्यामुळे कोरोना पसरण्याची भीती असतानाच तालुक्यातील जामठी गावाने कोरोनापासून बचावासाठी गावाची सीमाच बंद केली आहे. गावाच्या सीमारेषेवर नाकाबंदीचा दांडा लावण्यात आला असून या माध्यमातून कोरोनामुक्तीचा मार्गही शोधण्यात आला आहे.

तर होईल कोरोनाशी सामना
जामठी गावात प्रवेश करण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली असून अपवादात्मक परीस्थितीत गावात जाण्यासाठी प्रवेश दिला जात आहे शिवाय त्यासाठी नाव व पत्ता नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या व्यक्तींना विचारूनच आत प्रवेश दिला जात आहे त्यामुळे एखादा संशयीत रुग्ण सहजासहजी गावात जाऊ शकत नाही. जामठी गावाचा आदर्श जर प्रत्येक गावाने घेतला तर कोरोनाशी आपण सहज सामना करू शकतो, असा आशावादही यातून व्यक्त होत आहे.

तपासणी करूनच यायचे आवाहन
सुरुवातीला देशाच्या काही भागात पसरलेल्या कोरोनाने आता सगळीकडे थैमान घातलं आहे. त्यामुळे आता अगदी गाव-गावात देखील बाहेरली येणार्‍या व्यक्तींना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली आहे. एवढंच नव्हे तर अधिकची खबरदारी म्हणून आंतरराष्ट्रीय, देशांतर्गंत विमान सेवा देखील बंद केली आहे. तसेच बस, रेल्वे यासारख्या दळणवळणाची साधने देखील सरकारने बंद करण्याचा मोठा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. दुसरीकडे जिल्हा-जिल्ह्यातील सीमादेखील बंद करण्यात आल्या आहेत. तसेच कर्फ्यू लावून लोकांना घराच्या बाहेर येऊ नये असं आवाहन देखील सरकारने केलं आहे.यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
ग्रामपंचायतीच्या वतीने येणार्‍या-जाणार्‍या लोकांची नोंद घेतली जात असून बाहेरून येणार्‍या नागरीकांना प्रथम दर्शनी तपासणी करून येण्यास सांगितले जात आहे.