रोकड सुरक्षित : एटीएम शेजारी आढळल्या दारूच्या बाटल्या
बोदवड : तालुक्यातील जामठी येथील शर्माजी कॉम्प्लेक्समधील टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम सळई, टिकाव व विळ्याने सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न फसला असून एटीएममधील तीन हजार 500 रुपयांची रोकड सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी पहाटे ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, एटीएम शेजारी दारूच्या बाटल्या आढळून असल्याने पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. चोरट्यांनी एटीएम फोडण्यापूर्वी सीसीटीव्ही व डीव्हीआरदेखील नासधूस केल्याचे उघड झाले. चोरट्यांचा माग घेण्यासाठी जळगावातून आलेल्या श्वानाने काही अंतरापर्यंत माग दाखवला माात्र नंतर श्वान घुटमळले.
एटीएम फोडण्याच्या प्रयत्नाने खळबळ
जामठी गावातील शर्माजी कॉम्प्लेक्समध्ये टाटा इंडिकॅश बँकेचे एटीएम असून मंगळवारी पहाटे चोरट्यांनी एटीएम मशीन ठेवलेल्या दालनात प्रवेश करीत हे एटीएम खाली पाडून विविध हत्यारांच्या सहाय्याने रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही तर चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही तसेच डीव्हीआर फोडून त्याचे नुकसान केले. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता ही घटना उघडकीस आली. बोदवड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भाईचंद मालचे, संजय भोसले, निखील नारखेडे घटनास्थळी भेट देत पाहणी केली तर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी माहिती जाणून घेतली. पोलिस उपअधीक्षक सुरेश जाधव, मुक्ताईनगरचे पोलिस सुरेश शिंदे.तसेच श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंतचा माग दाखवला. श्वान पथकाचे हॅण्डलर एच.सी.परदेशी, पी.सी.झोपे, ठसे तज्ज्ञ एच.सी.घटाटे, साहेबराव चौधरी यांनी चोरट्यांचे ठसे घेतले आहेत.
पान सेंटरमध्येही चोरी
एटीएमपासून काही अंतरावर असलेल्याया संदीप भागवत माळकर यांच्या मालकीचे संदीप पान सेंटरमधून चोरट्यांनी चिल्लरसह सिगारेटची पाकिटे लांबवली.
सुरक्षा रक्षकाचा अभाव
या एटीएमच्या सुरक्षेकडे संबंधित बँकेने केलेला निष्काळजीपणाही उघड झाला असून या एटीएममध्ये सुरक्षारक्षक नसल्याची चोरट्यांना आयतीच संधी मिळाली. एटीएमशी छेडछाड झाल्यानंतर एसएमएस वा अलार्म देखील वाजला नसल्याची माहिती आहे.