जामठीत पाणी पेटले : महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

0

जामठी- गावात पाणीप्रश्‍न बिकट झाल्याने तसेच नागरी सुविधा मिळत नसल्याने प्रभाग क्रमांक तीनमधील संतप्त महिलांनी शुक्रवारी सकाळी थेट ग्रामपंचायतीवर मोर्चा काढत संताप व्यक्त केला. प्रभाग क्रमांक तीनला ओडिए योजनेव्यतिरिक्त या प्रभागास कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.
कुपनलिकेचा वीजपुरवठा हा सुरू होऊनही व 30 ते 35 दिवस उलटूनही या प्रभागात कुठलाही पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. येथील स्मशानभूमीत नवीन कूपनलिकेच्या दुरुस्तीअभावी ती बंद आहे. त्यामुळे या प्रभागातील नागरीकांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. याकडे व ग्रामपंचायत प्रशासन साफ दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप महिलांनी केला. ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने विशेष ग्रामसभा बोलवावी व त्यात मांडलेल्या प्रभागातील सर्व समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात अन्यथा हे आंदोलन बोदवड पंचायत समितीसमोर करण्यात येईल, असा इशारा रणरागिणींनी दिला.