जामडी येथील पाझर तलावाच्या चौकशीची मागणी

0

चाळीसगाव – तालुक्यातील जामडी येथील पाझर तलाव क्रमांक १ च्या नविन नुतनीकरण कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करुन ठेकेदारासह संबंधीत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जामडी गावचे ग्रा.प.सदस्य यांच्यासह ग्रामस्थांनी उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जि.प.ल.पा उपविभाग चाळीसगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे आज केली. चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

गावाजवळ पाझर तलाव क्र १ सांडव्याचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे त्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पाझर तलाव भरला असला तरी नित्कृष्ट काम झाल्याने जमा झालेले पाणी खालुन पाझरत आहे. अशीच परिस्थिती असल्यास काही दिवसातच जमा झालेले पाणी पाझरुन निघुन जाईल ठेकेदाराने काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे काम केल्याने शासनाचा पैसा पाण्यात गेला आहे.

या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी व्हावी, कामाची पाहणी करुन पुर्णत्वाचा दाखला देणाऱ्या शाखा अभियंता यांची चौकशी करावी, कामाची बिले अदा करु नये तसेच यात दोषी असलेले ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर ग्रा.प.सदस्य दिपकसिंग राजपुत व ग्रामस्थ बापु पाटील, दिपक पाटील, शामसिंग राजपुत आदींच्या स्वाक्षरी आहेत.